पुणे

पुण्यात महायुतीचे शक्तिप्रदर्शन; बारामतीसाठी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी दाखल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभेची ही निवडणूक गावपातळीवरील किंवा विधानसभेची नसून, देशपातळीवरील निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा, बारामतीचा विकास करण्यासाठी, देश मजबूत करण्यासाठी ही निवडणूक आहे, असा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात ठासून मांडला.
बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुण्यात आयोजिलेल्या सभेत ते बोलत होते.

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवेत, की राहुल गांधी हवेत, अशी विचारणा करीत या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार स्थानिक पातळीवरून देशपातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. विकासासाठी राज्य व केंद्रात मोदी सरकार हवे, तसेच विकासासाठी केंद्रातून निधी मिळविण्यासाठी बारामतीमध्ये मोदी यांच्या बाजूचा खासदार हवा, असाही मुद्दा या नेत्यांनी मांडला. त्यामुळे, बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ही विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई आहे.

निवडणूक लोकसभेच्या एका मतदारसंघापुरती मर्यादीत नाही. देश बलशाही, मजबूत बनविण्यासाठीची आहे. यांना लेकीत व सुनेत अंतर वाटते. त्यांना मनात मांडे खाऊ द्या. ज्यांच्या मनात मांडे, त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाहीत. बारामतीकरांनी परिवर्तन करावयाचा संकल्प केला आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. अबकी बार सुनेत्राताई पवार हा निर्णय त्यांनी घेतला आहे. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे.

मार्केटमध्ये मोदी गॅरंटी चालते. मोदी पंतप्रधान हवेत की, राहुल गांधी हवेत, या प्रश्नातून जनतेतून मोदी-मोदी असे उत्तर येते. काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांना अनेकवेळा प्रयत्न करूनही लाँच करू शकला नाही. मोदींकडे आत्मविश्वास आहे, तिकडे अहंकार आहे. अहंकार विनाशाकडे नेतो, तर आत्मविश्वास विजयाकडे नेतो. ही विकासाची निवडणूक असून, भावनिक नाही, असे शिंदे यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, आजच्या सभेची गर्दी पाहून सुनबाई दिल्लीला जातील, हे नक्की झाले आहे.

ही पवार विरुद्ध पवार, सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई नाही. देशाचा नेता कोण हे ठरविण्यासाठीची लोकसभेची निवडणूक आहे. बारामतीचा खासदार हा मोदीच्या बाजूने उभा राहणार की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहणार, ते ठरणार आहे. विकासाला का विनाशाला मत द्यावयाचे, याचा निर्णय घ्यायचा आहे. काहीजण भावनिक मुद्दयांवर नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोदी यांनी दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. बारामतीच्या विकासासाठी त्यांची मदत मिळेल. अजित पवार म्हणाले, ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. काहीजण भावनिक मुद्दे मांडून भावकीचा मुद्दा आणत आहेत. आम्ही पुन्हा एकत्र येणार, अशी बनवाबनवी काहीजण करीत आहेत. त्याला फसू नका.

पुणे शहर व जिल्ह्यातील विविध विकास कामांची उल्लेख करीत पवार म्हणाले, निधी मिळण्यासाठी केंद्रातील सत्ता बरोबर हवी. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपली ताकद वाढली आहे. महायुतीतील घटक पक्षांची सर्व ताकद एकत्रित पणे कामाला लागली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार प्रफुल्ल पटेल, उमेदवार सुनेत्रा पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, खासदार मेधा कुलकर्णी यांची भाषणे झाली. प्रदीप गारटकर यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

ठरलेल्या गोष्टी पाळणार, हा माझा शब्द

विजय शिवतारे यांचा उल्लेख करीत अजित पवार म्हणाले, की विरोधक कसा असावा, ते त्यांच्याकडे बघून शिका. मैत्री कशी असावी, तेही त्यांच्याकडून शिकावे. त्यांची मैत्री झाल्यावर ते जोरात कामाला लागले. पुरंदर हवेलीत ताकद वाढली. त्यांच्या प्रयत्नाने कुलदीप कोंडे देशमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. भाजपमुळे खडकवासल्यात मोठे मतदान मिळेल. फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ठरलेल्या गोष्टी मी तुम्हाला देणार, हा शब्द या सभेत सर्वांच्या साक्षीने देतो.

रामदास आठवलेंची कविता

अजितदादा आता राहिले नाहीत खुळे
त्यामुळे हारणार आहेत सुप्रिया सुळे
कोणी कितीही केला कल्ला
तरी सुनेत्रा पवार जिंकणार बारामतीचा किल्ला

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ही कविता सादर करीत प्रचाराला प्रारंभ केला, तेव्हा उपस्थितींना त्यांना उत्स्फूर्त दाद दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT