खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा महामार्गावरील कोंढणपूर फाटा ते खेड शिवापूरदरम्यानच्या सेवा रस्त्यावर ड्रेनेज लाईन फुटून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. या सेवा रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून, त्या खड्ड्यात दुर्गंधीयुक्त पाणी साचत आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून, याचा आर्थिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे.
एकीकडे एनएचएआय महामार्गाचे काम पूर्ण केले आहे, असे सांगत असताना दुसरीकडे मात्र मोठे खड्डे पडले आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. खड्ड्याध्ये पाणी साचून त्याचा अंदाज दुचाकीस्वराला येत नसल्याने अपघात होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. वेळोवेळी याची कल्पना एनएचएआयला दिली असून, कोणतीही कारवाई केली जात नाही, हे दुर्दैव आहे, असे म्हणावे लागेल.
मार्गावरून विद्यार्थ्यांची ये-जा असते, त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. एनएचएआयचे अधिकारीही याच रस्त्याने अनेक वेळा गेले आहेत. मात्र, तरीही सेवा रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
सेवा रस्त्याला माझी स्वतःची जमीन गेली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, त्यामध्ये ड्रेनेजमधील पाणी साठवून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याबाबत एनएचएआयच्या अधिकार्यांना सांगून जागेवर आणून परिस्थिती दाखवली, मात्र रस्त्याचे काम करण्याबाबत चालढकल केली जात आहे. एनएचएआयचे यादव नाव असलेले अधिकारी फोन घेतच नाहीत. यामुळे आम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याची खंत हॉटेल व्यावसायिक राजेंद्र पवार यांनी व्यक्त केली.