धायरी : पुढारी वृत्तसेवा
सिंहगड रोड परिसरातील नर्हे गावात असलेले सुंदर अशा हिरवळीने नटलेले सेल्फी पॉईंट उद्यान आता भकास होऊन त्याची मोठी दुरवस्था झाली आहे.
येथील बगीचातील हिरवीगार हरळी गायब होऊन फक्त मातीच दिसत आहे. यामुळे परिसरातील नागरिक मोठा संताप व्यक्त करीत आहेत. येथील मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असणार्या सेवा रस्त्याच्या कडेला महामार्ग रस्त्यालाच 2016-17 मध्ये नर्हे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांच्या आग्रहास्तव सेल्फी पॉईंट उद्यान तयार करण्यात आले होते.
या उद्यानात छोट्या मोठ्या झाडांसोबत हिरवीगार हरळी गवत लावण्यात आले होते. या हरळीवर सतत पाण्याचे कारंजे सुरू ठेवण्यात आले होते तसेच पिवळ्या रंगाचे स्मायली इमोजी बसविण्यात आले होते. मुलांना खेळण्यासाठी विविध खेळाचे साहित्य बसविण्यात आले होते. यामुळे चिमुकल्या मुलांबरोबरच, नागरिक, युवक युवती, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे हे ठिकाण आकर्षक बनले होते, परंतु या सेल्फी पॉइंटची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. येथे लावलेली हिरवळ, झाडे, मुलांची खेळणी गायब झाली आहेत. पिवळ्या रंगाचे स्मायली इमोजी निखळून पडले आहेत.
नर्हे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना, मुलांना, महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना येथे विरंगुळ्यासाठी येथे सेल्फी पॉईंट उद्यान बनविण्यात आले होते. या उद्यानाचा लाभ येथील सर्वांनाच मिळत होता.
– सुहास रानवडे पाटील, ग्रामपंचायत माजी सदस्य