कडूस : पुढारी वृत्तसेवा आगरमाथा (ता. खेड) परिसरातील रानमळा रस्त्यावर मेननाथ श्रीपती बोरकर यांच्यावर आज (शनिवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने अचानक जीवघेणा हल्ला केला. आगरमाथा परिसरात तीन महिन्यांपुर्वी धावत्या वाहनावरील दोन युवकांवर बिबट्याने हल्ला केला असल्याची घटना ताजी असतानाच आता बिबट्याने भरवस्तीत शिरून नागरिक व जनावरांवर हल्ला केल्याने वनविभाग देखील चिंतेत पडला आहे.
आगरमाथा परिसरातील रानमळा रस्त्यावर बोरकर यांच्या घराचे काम चालू असून, ते आपल्या घराला पाणी मारण्यासाठी गेले होते. यावेळी घराच्या थंड गारव्याला झोपलेल्या बिबट्याने बोरकर यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी हल्ल्याला प्रतिकार केला. दरम्यान भर वस्तीत बिबट्या घुसल्याने नागरिकांची एकच धावपळ सुरु झाली. बघ्यांची गर्दी झाल्यानंतर बिबट्याने जवळच्या गवताळ भागात धूम ठोकली. मात्र, बिबट्याबरोबर झालेल्या झटापटीत मेननाथ जखमी झाले आहेत. त्यांच्या हाता-पायाला बिबट्याचे पंजे लागले आहेत.
वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून, बिबट्याचा शोध सुरू आहे. ग्रामपंचायत सदस्य गणेश मंडलिक, नंदू जाधव, ॲड. सुजय जाधव यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून मेननाथ यांच्यावर सुरुवातीला प्राथमिक उपचार कडूस येथे केले व नंतर चाकण येथील रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले आहे.
पाहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…