नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलिस ठाणे हद्दीतील कावळ पिंपरी या ठिकाणी दि. ९ मार्च रोजी झालेल्या रोहिदास पाबळे खून प्रकरणातील मुख्य सुत्रधारस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पनवेल येथून अटक केली. ही माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली. दिलीप रामा आटोळे (वय ४४, रा. कावळपिंपरी, ता. जुन्नर, मुळ रा. मोहाडी धुळे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि. ९ मार्च रोजी कावळ पिंपरी येथील रोहिदास पाबळे याचा जुन्या भांडणाचा राग मनात धरून दत्ता भाकरे व त्याचे इतर साथीदारांनी मिळून खून केला होती. यावेळी रात्रीचे वेळी त्यांनी पाबळे याच्यावर अचानक हल्ला चढवत गावठी पिस्तुलातून गोळीबार करत व धारदार शस्त्रांनी वार करून खून केला होता.
या गुन्ह्यातील एकूण पाच आरोपी व एक अल्पवयीन बालकास यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार दिलीप आटोळे हा पोलिसांना गुंगारा देत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिलीप आटोळे हा त्याचे पत्नीसह करंजाडे, पनवेल येथे असल्याची माहिती मिळाल्याने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासकामी त्याला नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील खुन, खंडणी, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके व पथकाने केली.