पुणे

पुणे : आईचा ड्रेनेज चेंबरमध्ये अडकला पाय; मुलाने केली उपचार खर्चाची महापालिकेकडे मागणी

Shambhuraj Pachindre

पुणे; पुढारी वृत्तसेवा : "पुणे तिथे काय उणे" अशी म्हण प्रचलित आहे. याचा अनुभव आता थेट महापालिका प्रशासनालाच आला आहे. शहरातील रस्त्यावरील ड्रेनेज चेंबरच्या जाळीत आईचा पाय अडकल्याने त्यावर जो वैद्यकिय उपचाराचा खर्च करावा लागला. त्याची नुकसान भरपाई महापालिकेने द्यावी, अशी मागणी मुलाने महापालिकेकडे केली आहे. त्याचबरोबर दोषपुर्ण आणि बेजबाबदार काम करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

काय आहे नेमका प्रकार?

सिंहगड रस्त्यावरील हिंगणे चौकातून जात असताना तक्रारदार यांच्या आईचा पाय चेंबरच्या जाळीत अडकला. जवळपास अर्धा तास त्यांचा पाय अडकून होता. त्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अर्ध्या तासानंतर जाळीचा गज कापून तक्रारदार यांच्या आईचा पाय बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन पायावर उपचार घेतले. संबधित रस्त्यावर वारंवार असे प्रकार घडत असताना महापालिका काहीच उपाय योजना करत नसल्याने तक्रारदार यांनी नाराजी व्यक्त केली.

तसेच आईच्या उपचाराच्या खर्च द्यावा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी पुरावे म्हणून संबधित जाळीचे फोटोही दिले आहेत. महापालिकेला आणखी पुरावा हवा असल्यास या ठिकाणीचे प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्हींची पाहणी करून घ्यावी, असे तक्रारदार यांनी आयुक्तांना दिलेल्या तक्रार पत्रात म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT