पुणे

पिंपरी : विधान परिषद निवडणुकीसाठी आमदार जगताप मतदान करणार

अमृता चौगुले

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा :  विधान परिषदेच्या सोमवारी (दि. 20) होणार्‍या निवडणुकीसाठी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी असतानाही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रुग्णवाहिकेतून ते मतदानासाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले. आ. जगताप हे गंभीर आजाराने ग्रस्त असून बाणेर येथील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देऊन ते घरी परतले आहेत.

त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत आमदार जगताप यांनी स्वतःचे आजारपण बाजूला ठेवत व पक्षनिष्ठा जोपासत रुग्णवाहिकेतून मुंबईला जाऊन मतदान केले. त्यामुळे अतिशय चुरशीच्या झालेल्या सहाव्या जागेसाठी भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले. हा विजय आ. लक्ष्मण जगताप यांना समर्पित केल्याच्या भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या होत्या.

आता होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली जोरदार सुरू आहेत. आपले आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांनी नाकेबंदी केलेली असताना भारतीय जनता पक्षानेही अनेक डावपेच आखले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आमदार जगताप यांनी आपले प्रकृती अस्वास्थ्य बाजूला ठेवून पक्षनिष्ठा जोपासण्याचे ठरविले आहे. सोमवारी रुग्णवाहिकेतून जाऊन ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे भाजप व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

SCROLL FOR NEXT