पुणे

पिंपरी :  दोन लाख मतदारांची नावे आजूबाजूच्या प्रभागात

अमृता चौगुले

पिंपरी :  शहरातील दोन लाखांपेक्षा अधिक मतदारांची नावे शेजारच्या प्रभागाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांसह माजी नगरसेवक व इच्छुकांनी हरकती नोंदविल्या आहेत. अकरा दिवसांत 5 हजारांपेक्षा अधिक हरकती महापालिकेच्या निवडणूक विभागात जमा झाल्या आहेत.

येत्या 4 दिवसांत प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी करण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागणार आहे. अंतिम यादी शनिवारी (दि.9) प्रसिद्ध केली जाणार आहे. पालिकेने प्रारूप 1 ते 46 प्रभागनिहाय मतदारयादी 23 जूनला प्रसिद्ध केली. त्यानंतर प्रभागातील अनेक मतदारांची नावे आजूबाजूच्या प्रभागात नोंदविल्याची तक्रारी सुरू झाल्या.

यादीतील घोळावर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले, भाजपच्या आमदार उमा खापरे, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले तसेच, माजी नगरसेवक व इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हरकती स्वीकारण्यास दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.

माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी व इच्छुकांनी 500 ते 2 हजार मतदारांच्या यादीसह हरकती नोंदविल्या आहेत. अखेरच्या दिवशी सायंकाळी साडेसहापर्यंत हरकती घेण्याचे काम सुरू होते. त्यासाठी इच्छुकांसाठी कार्यकर्त्यांची
धावपळ सुरू होती.

यादीतील शीर्षकांमुळे घोळ
भारत निवडणूक विभागाने तयार केलेली मतदार यादी फोडून प्रभागनिहाय यादी पालिकेने तयार केली. राज्य निवडणूक आयोगाने पत्त्याचे शीर्षक लक्षात घेऊन त्याप्रमाणे यादी फोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काम झाल्याने अनेकांची नावे आजूबाजूच्या प्रभागात समाविष्ट झाली आहेत.

चार दिवसांत काम पूर्ण करण्याची कसरत
शहरात 1 हजार 400 यादी भाग आहेत. सहा भाग यादीचे कामासाठी एक प्रगणक (बीएलओ) नियुक्त केला आहे. असे एकूण 235 बीएलओ आहेत. 48 निरीक्षक आणि 8 क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्त केले आहेत. कर्मचारी 4 दिवसांत घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत.

आम्ही हरकत नोंदविली नाही
माजी नगरसेवक व इच्छुकांनी हरकतींचे गठ्ठेच्या गठ्ठे सादर केले आहेत. हरकतींचे प्रभागनिहाय वर्गीकरण करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यास बीएलओना सांगितले आहे. त्यानुसार कामकाज सुरू केले आहे. मतदारांची भेट घेतली किंवा त्यांना संपर्क साधला असता आम्ही हरकत नोंदविली नसल्याचे ते सांगत आहेत.

…अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय
हरकती घेऊनही पालिकेने मतदार नावे प्रभागात समाविष्ट केले किंवा नाही, हे अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर समजणार आहे. हरकतीची दखल न घेतल्यास माजी नगरसेवक व इच्छुकांना न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.

275 यादींची विक्री
हरकत नोंदविण्यासाठी इच्छुकांनी प्रारूप मतदार यादी विकत घेतल्या. अकरा दिवसांत एकूण 275 प्रभाग यादींची विक्री झाली. त्यातून पालिकेस 6 लाख 33 हजार 329 रुपयांचे उत्पन्न मिळाले. माजी नगरसेवक, पदाधिकारी व इच्छुकांनी केवळ नावे टाकून हरकत नोंदविली आहे. रहिवाशी पुरावे असलेल्या हरकतींची शहानिशा होणार आहे. सरसकट दिलेल्या नावांची यादी ग्राह्य धरली जाणार नाही, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT