पुणे

पिंपरी : केकवरील टॅगला तरुणाईची वाढती पसंती

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : छानसा सजवलेला केक आपल्या प्रिय व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त 'प्रेझेंट' करणे सध्याच्या तरूणाईमध्ये ट्रेंड बनले आहे. या केकवरील मजेशीर टॅगलाही तरुणाईची मोठी पसंती मिळत आहे. 'शेतकरी', बागायतदार, नवरोबा, पाटलीण, आयुष्य गंडलय, सेल्फी क्वीन, मॉम, डॅड, ड्रामा क्वीन, साहेब, जान, जिगरी' … असे गमतीदार आणि मजेशीर टॅग केकवर लावून भेट देण्याला तरुणाईची अधिक पसंती दिसून येत आहे. त्यामुळे केकच्या दुकानांमध्ये वेगवेगळी गमतीशीर टॅग निदर्शनास  पडत आहेत.

आपल्या नातेवाइकांना आणि मित्र-मैत्रिणींना त्यांच्या स्वभावानुसार किंवा गंमत म्हणून असे वेगवेगळे टॅग केकवर लावण्याचा ट्रेंड  दिसून येत आहे. यामध्ये 'शेतकरी', 'बागायतदार', 'पाटील' आणि 'पाटलीण' या टॅगना अधिक पसंती असल्याची माहिती शहरातील केक विक्रेत्यांनी दिली. उपलब्ध टॅगच्या व्यतिरिक्त नागरिकांच्या ऑर्डरनुसारही विक्रेते टॅग उपलब्ध करून देतात. केक सोबतच वेगवेगळ्या टॅगचीही मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग विषयी माहिती
अ‍ॅक्रेलिक प्रकारच्या प्लास्टिकपासून हे टॅग बनविले जातात. यासाठी विके्रत्यांना टॅगसाठी ऑर्डर द्यावी लागते. टॅगच्या साईजनुसार त्याची किंमत ठरते. टॅगची किंमत दहा रुपयांपासून दीडशे-दोनशे रुपयांपर्यंत असते. 'हॅप्पी मॅरेज लाईफ'च्या टॅगला अधिक मागणी आहे. तर 'बेरोजगार', 'रिकामा', 'सिंगल' व 'बॅचलर' अशा टॅगला कॉलेज युवकांची पसंती आहे.

केकसोबत ग्राहक मॅजिक मेणबत्ती, फुगे अशा वस्तूंची मागणी करीत होते. मात्र, आता नवनव्या टॅगसाठीदेखील मागणी करीत आहेत. त्यासाठी दोन ते तीन दिवसांपूर्वीच ऑर्डर दिल्या जात आहेत. कॉलेज तरुणांची गमतीशीर टॅगला अधिक मागणी आहे.
– आशिष झोपे, विक्रेता

SCROLL FOR NEXT