पुणे

पावसाळी आजारांपासून जपा; विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोरोनाबरोबरच पावसाळी आजारांमुळे मुलांना पोट, श्वसन आणि त्वचा यांसारख्या विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करण्याबरोबरच मुले निरोगी असल्याची पालकांनी खात्री करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, शाळांमध्ये विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला शासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

कोरोनामुळे मागील दोन शैक्षणिक वर्षे प्रभावित झाली. या वर्षी शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू होत आहे. पावसाळी आजारांनीही डोके वर काढले असून, प्रत्येक विद्यार्थ्याने कोरोना नियमांचे पालन करणे आणि पावसाळ्यात सतर्क राहणे आवश्यक आहे. डॉ. संजय नगरकर म्हणाले, 'देशाने कोरोनावर अद्याप मात केलेली नसून गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळेत जाणार्‍या मुलांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. एकमेकांजवळ बसणे, हस्तांदोलन करणे किंवा पुस्तके किंवा कोणत्याही वस्तूंची देवाणघेवाण करणे टाळले पाहिजे. मुलांनी मास्क घालावा, आपल्यासोबत हँड सॅनिटायझर बाळगावे आणि ते आजारी असल्यास किंवा घरात कोणी आजारी असल्यास शाळेत जाणे टाळावे.'

बालरोगतज्ज्ञ डॉ. वृषाली बिचकर म्हणाल्या, 'दमट हवामान आणि बदलते तापमान जिवाणू आणि बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असून, त्यामुळे खाज सुटणे, लालसरपणा आणि पुरळ येण्याची शक्यता असते. मुलांना या लक्षणांबाबत जागरूक करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे मुलांमध्ये खोकला, सर्दी, न्यूमोनिया किंवा दम्यासारखे श्वसनाचे संक्रमण होऊ शकते.

मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे, पेटके येणे, अन्नातून विषबाधा, आम्लपित्त, छातीत जळजळ, अपचन आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिस यांसारख्या पचनाच्या समस्यादेखील विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतात. मुलांनी शाळेत सकस आहार घ्यावा आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरणास पात्र असल्यास लसीकरणदेखील करून घ्यावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT