पुणे : पुढारी वृत्तसेवा
पावसाळा आला, तरीही महापालिकेकडून केली जाणारी पावसाळापूर्व कामे अद्याप सुरूच आहेत. शहरातील ओढे आणि नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी राडारोडा, कचरा दिसत असताना प्रशासनाने मात्र 90 टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. उर्वरित कामे 10 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे, नाले, पावसाळी गटारे, चेंबर आदींची साफसफाई आणि राडारोडा उचलण्याची कामे केली जातात तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी डांबरीकरण केले जाते.
ही कामे दरवर्षी एप्रिलमध्ये सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते. मात्र, पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते, चेंबर तुंबतात, रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे पावसाळी कामे होण्यावर संशय व्यक्त केला जातो.
महापालिका प्रशासनाने यंदाही पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांसाठी वेगवेगळ्या 11 कोटी रुपयांच्या 28 निविदा काढल्या आहेत. या निविदाही दरवर्षीप्रमाणे कमी दरानेच आलेल्या आहेत. ही कामे मेअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले होते. आता पावसाळा आला, एक दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडू शकतो. असे असताना शहरात अजूनही पावसाळापूर्व कामे सुरूच आहेत.
पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांचा आढावा घेतल्यानंतर 31 मेपर्यंत 90 टक्के कामे पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. उर्वरित कामे 10 जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका