पुणे

पालखी सोहळा मुक्कामी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कीटकनाशकांची फवारणी सुरू

अमृता चौगुले

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा: अंथुर्णे (ता. इंदापूर) परिसरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी जलशुद्धीकरण करण्यात येत असून, परिसरात कीटकनाशकफवारणी करण्यात येत आहे. येथे शुक्रवारी (दि. 30) तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामी येणार आहे. दरम्यान, दोन वर्षांनंतर निघणार्‍या या पालखी सोहळ्यात लाखोच्या संख्येने वारकरी सामील होणार असल्याने आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार प्रशासन कामाला लागले आहे.

ग्रामपंचायत व आरोग्य विभागाची लगबग सुरू आहे. अंथुर्णे व भरणेवाडी गावातील विहिरी, कूपनलिका (हातपंप) तसेच मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या विहिरींमध्ये जलशुद्धीकरणासाठी टीसीएल टाकण्यात येत आहे. याशिवाय गावातील हॉटेल तपासणी करून सूचना देण्यात येत असून, डास होऊ नये म्हणून परिसर स्वच्छ करून पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. प्रामुख्याने गावांमधील प्रत्येक घरामध्ये कीटकनाशक फवारणीची धुरळणी केली जात आहे.

दरम्यान, गावामध्ये सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी इंदापूर तालुका आरोग्याधिकारी डॉ. जीवन सरतापे, डॉ. प्रशांत महाजन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक ताटे, अंथुर्णेचे सरपंच लालासो खरात, भरणेवाडी सरपंच स्वाती भरणे यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी दीपक भोसले, भीमराव भागवत, समुदाय आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT