पुणे : पुढारी वृत्तसेवा
बा रायगड परिवार ही नोंदणीकृत संस्था असून, दुर्गसंवर्धनाचे कार्य करीत आहे. या संस्थेने जुन्नर तालुक्यातील खोडद येथील नारायणगड येथे स्वछता मोहीम घेत समाजापुढे एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.
गडकिल्ल्यावर जमा होणारे प्लास्टिक रॅपर, दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या या सारख्या निसर्गाला हानी पोहोचवणार्या गोष्टी कुठंतरी गडकिल्यांच्या अस्तित्वावर घाला घालत आहेत.
ते थांबवून नवीन पिढीला आपल्या पूर्वजांच्या देदीप्यमान इतिहास बघता यावा यासाठी 'बा रायगड' परिवार कायम प्रयत्नशील आहे. नारायणगडावरील पाण्याच्या टाक्यांची पावसाळ्याआधी स्वच्छता करण्याचे नियोजन केले होते.
त्याप्रमाणे स्थानिक ग्रामपंचायत, वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत साधारणपणे 45 ते 50 सदस्यांनी सक्रिय सहभाग घेत गडकिल्ल्यावर स्वछता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
या सर्व मोहिमांचे नियोजन बा रायगड परिवाराअंतर्गत शासकीय-निमशासकीय यंत्रणा, वनविभाग, आरोग्य विभाग, पुरातत्व विभाग यांच्या व स्थानिकांच्या सक्रिय सहभागाने करण्यात आले, अशी माहिती परिवाराचे चैतन्य भालेराव यांनी दिली.