पुणे

नवीनकुमार जिंदाल यांच्यावर पुण्यात गुन्हा; पैगंबरांबद्दल वादग्रस्त टि्वट भोवले

अमृता चौगुले

पुणे : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेले नवीनकुमार जिंदाल यांच्यावर पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंदाल यांच्या टि्वटमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत झाकीर इलियास शेख (वय 30, रा. मीठानगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत सोशल मीडियावर अवमानकारक टिप्पणी केली होती. त्यांच्या या टिप्पणीनंतर राज्यासह देशभरात पडसाद उमटले असून, मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे.

जिंदाल आणि निलंबित भाजप प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्याविरोधात राज्यातील सोलापूर, नगरसह इतर शहरांत काल मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. अशातच आता कोंढवा पोलिस ठाण्यात जिंदाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिंदाल यांनी 1 जून रोजी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विवाहाविषयी वादग्रस्त टि्वट करीत मुस्लिमधर्मीयांच्या भावना दुखावणारे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार जिंदाल यांच्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या 153 (ए), 153 (बी), 295 (अ), 298, 505 (2) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT