पुणे

नवीन नाटकेही हाऊसफुल्ल; नाटकांच्या अर्थकारणात होतेय सुधारणा

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक नाटकांना चांगला प्रतिसाद मिळत असून, जुन्या नाटकांसह नवीन नाटकांचे प्रयोगही हाऊसफुल्ल होत आहेत. त्यामुळे नाटकांमागे मिळणारे उत्पन्नही थोडे बहुत वाढले आहे.
नाट्य निर्मात्यांनी नवीन व्यावसायिक नाटके रंगभूमीवर आणली असून, प्रसिद्ध कलाकार या नाटकांमध्ये भूमिका करत असल्याने त्याला मिळणारा प्रतिसाद खूप चांगला आहे. खासगी नाट्यगृहांच्या पालिकेच्या नाट्यगृहांमध्ये विकेंडला होणार्‍या प्रयोग तर हाऊसफुल्ल होत आहेत.

दरवर्षी रंगभूमीवर 25 ते 30 नवीन व्यावसायिक नाटके येतात, पण कोरोनामुळे दोन वर्ष नाट्यनिर्मात्यांनी नवीन नाटके रंगभूमीवर आणली नाहीत. परंतु कोरोनाची स्थिती सुरळीत झाल्यावर रंगभूमीवर येणार्‍या व्यावसायिक नाटकांची संख्या वाढली आहेे.
विशाखा सुभेदार यांच्यापासून ते डॉ. गिरिश ओक यांच्यापर्यंत…असे प्रसिद्ध कलाकार नवीन नाटकांमध्ये भूमिका करत असल्याने प्रेक्षकही नाटकांना गर्दी करत आहेत.

पुन:श्च हनीमून, संज्या छाया, कुर्रर्रर्रर्र, खरं खरं सांग आणि 38 कृष्ण व्हिला अशी नवीन नाटके रंगभूमीवर आली आहेत. नाट्य व्यवस्थापक मोहन कुलकर्णी म्हणाले, 'जुन्या नाटकांचे प्रयोग तर सुरू आहेतच. पण, त्यात नवीन नाटकांचीही भर पडत आहे. जुन्या नाटकांसह नव्या नाटकांना चांगला प्रेक्षकवर्ग लाभत आहे. विकेंडला गर्दी होत आहे. त्यामुळे व्यावसायिक नाट्यनिर्माता सध्या खूश आहे. नवीन नाटकांमध्ये नामवंत कलाकारांच्या भूमिका असल्याने त्या नाटकांनाही प्रतिसाद मिळत आहे.'

वर्षभरात जवळपास दहा नवी नाटके रंगभूमीवर

दरवर्षी 25 ते 30 नवीन व्यावसायिक नाटके रंगभूमीवर येतात. पण, यंदा पाच ते दहा नाटके रंगभूमीवर आली आहेत. परंतु नवीन नाटकांचे प्रयोग मोठ्या प्रमाणात होत असून, या नाटकांचे प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देत स्वागतही केले आहे.. सध्याला एका नाटकाच्या प्रयोगाची एक ते सव्वा लाख रुपयांची तिकीट विक्री होत असून, नाटकांसाठी तेवढाच खर्च निर्मात्यांना करावा लागत आहे.

मुंबईतील नाट्य निर्मात्यांच्या नाटकांचे प्रयोग पुण्यात मोठ्या प्रमाणात होत आहेत. पुण्यातील नाटकांचे प्रयोगही होत असून, नाटकांना चांगला प्रतिसाद आहे. प्रेक्षकांचा उत्साह वाढला आहे. माझ्या नाटकांच्या प्रयोगालाही प्रतिसाद असून, व्यावसायिक नाटकांना अच्छे दिन आले आहेत. रंगभूमीवर नवीन नाटक आणण्याचा विचार असून, त्याची तयारी सुरू केली आहे. त्याच्यावर सध्या काम सुरू आहे. लवकरच ते रंगभूमीवर येईल.

भाग्यश्री देसाई, नाट्य निर्मात्या

हेही वाचा

SCROLL FOR NEXT