पुणे

नंदीवाल्या भटक्यांचं जीवन दुःख, कष्ट, दारिद्र्यानं ग्रासलेलं

अमृता चौगुले

युवराज खोमणे

सोमेश्वरनगर : सुया घे, दाभण घे, काळं मणी घे, बिब्व घे, दाताचं दातवण घे, शिळी भाकर तुकडा वाढ गं माय… तुला बुरगुंडा होईल गं बयो तुला बुरगुंडा होईल…'धर्माचे माय वाढ. कर्माचे माय वाढ. शिरपाची माय, दुर्गाची माय, सखूची माय, ठकूची आय वाढ. शिळी भाकर तुकडा वाढ गे माय. तुला बुरगुंडा होईल. वाढगे माय…' एका खाकेत छातीशी बांधलेलं लेकरू (बुरगुंडा), दुसर्‍या खाकेत झोळी. डोईवर टोपली, त्यामध्ये दातवन, सागरगोट्या, बिबवे, लहान मुलांचं काजळ, सुया, दाभण, पोत, फनी, मनी, कानातील डूल, फुलं, नथ, मंगळसूत्र, गंगावण, कवड्या आणि हातात कुत्र्यांना हटकण्यासाठीची काठी घेऊन गावोगावी, गल्लोगल्ली, दारोदारी वणवण भटकणार्‍या माऊलीच्या बोचक्यातून आणि बुरगुंडाच्या रूपातून महान संत एकनाथांना अध्यात्म दिसलं.

दलित समाजाला गावाबाहेर का होईना वेगळी वस्ती होती. वेगळा का होईना पाणवठा होता. वेगळी स्मशानभूमी होती. पण, नंदीवाल्या समाजासारख्या भटक्यांना ना गाव होतं, ना घर होतं. आज इथं, तर उद्या तिथं. दलितांपेक्षा भटक्यांचं जीवन प्रचंड दुःखानं, कष्टानं, दारिद्र्यानं, मागासलेपणानं ग्रासलेलं होतं. राहणीमान, पेहराव पाहिला तर पुरुषांमध्ये धोतर, पायजमा, नेहरू, बंडी व डोक्यावर फेटा किंवा टोपी अन् पिळदार मिशी. महिलांमध्ये नऊवारी काष्टा, कपाळावर भलं मोठ सौभाग्याचं लेणं, नाकामध्ये नथ, हाता-तोंडावर गोंदण, हातात हिरव्या-पिवळ्या काचेच्या बांगड्या व डोक्यावर सतत पदर. दुष्काळी परिस्थितीमुळं नंदीबैलाचं पालन-पोषण करणं अवघड होऊ लागलं.

कालांतरानं नंदीबैल संभाळणं जड जाऊ लागलं. हळूहळू नंदीबैल व नंदीबैलाचा खेळ संपुष्टात येताना आपणास दिसून येत असेल.
कालांतरानं हा समाज हळूहळू एका जागी स्थायिक होऊ लागला. गावातील शेतकरी, पाटील, वतनदार, जमीनदार यांच्या शेतामध्ये मोलमजुरी करू लागला. मिळेल ते काम करू लागला. काबाडकष्ट करण्याची सवय व निष्ठता, यामुळं चांगले पैसे मिळू लागले. कालांतरानं काहींनी स्वतःचे व्यवसाय चालू केले. उदा. : भांडी विकणं, भंगार गोळा करणं, लग्नात वाजंत्री म्हणून जाणं, गवंडी सेंट्रिग काम करणं, खेळणी विकणं, आईस्क्रीम विकणं असे विविध व्यवसाय करू लागले. एका जागी स्थायिक झाल्यामुळे मुलांना शिक्षणाची गोडी लागली. जातीचे दाखले कसे काढायचे, हा एक या समाजातील लोकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही ठिकाणी माहिती व ज्ञानाअभावी अज्ञानानं एकाच घरातील भावकीतील व्यक्तींच्या वेगवेगळ्या जाती लागल्यामुळे दाखले काढण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. सरकारी मागणीनुसार जातीचा दाखला काढण्यासाठी आपल्या आजोबा-पणजोबांचा 61 वर्षांपूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखला सादर करणं गरजेचं आहे. जाचक अटींमुळे आज या समाजातील मुलांना जातीचे दाखले, जातपडताळणी कागदपत्रं, नॉन-क्रिमीलेअर सहजासहजी मिळत नसल्यानं मुला-मुलींना शिक्षण व नोकरीपासून वंचित राहावं लागत आहे.

आजच्या घडीला जर एखादी व्यक्ती नंदीबैलाचा खेळ करीत असेल तर ती जातीनं नंदीवालाच असेल, असं नाही. बदलत्या काळानुसार मूळच्या नंदीवाले समाजानं नंदीबैलाचा खेळ करणं हळूहळू बंद करून पुढे वाटचाल केलेली दिसून येईल. महाराष्ट्राची संस्कृती असणार्‍या या भटक्या नंदीवाले समाजाची संस्कृती टिकून राहणं गरजेचं आहे; अन्यथा पुढील काळात काळाच्या आड बुडालेल्या नंदीबैलाला पुढील युवा पिढी पुढे पुतळे, चित्रफीत, चित्रकला व गोष्टींच्या माध्यमातून मांडावं लागेल.
– विशाल तानाजी पवार, सोमेश्वरनगर, बारामती

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT