मैत्रिय योगतर्फे आंतरराष्ट्रीय योगदिन विविध उपक्रमांनी साजरा | पुढारी

मैत्रिय योगतर्फे आंतरराष्ट्रीय योगदिन विविध उपक्रमांनी साजरा

सातारा : पुढारी वृत्तसेवा येथील मैत्रिय योगच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दरम्यान, त्यांनी आयोजित केलेल्या योग शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मैत्रिय योगच्या अपर्णा शिंगटे व धारा गोहेल यांनी दि. 14 ते 21 जून या कालावधीत मोफत ऑनलाईन व ऑफलाईन प्राणायाम, ओंकार, ध्यान सप्ताह शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरासाठी अ. भा. या. शि. म.चे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद पारटे व महासचिव पुरब आनंदे, हिरकणी फाऊंडेशनच्या जयश्री शेलार, डॉ. शुभांगी गायकवाड, संचिता तरडे, वाणीश्री दास, पंकज दास, विकास बहुलेकर उपस्थित होते.

हिरकणी फाऊंडेशन व मैत्रिय योग यांच्या संयुक्त विद्यमानाने योगा फॉर ह्युमॅनिटी’ या संकल्पनेनुसार दि.17 जून रोजी राजमाता जिजाऊ स्मृतिदिनाचे औचित्य साधून संगम माहुली, ता. सातारा येथील काशी विश्‍वेश्‍वर मंदिर येथे मोफत सूर्यनमस्कार आणि रिदमिक योगाचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. तसेच कास पठारावर दि. 19 जून रोजी योग प्रात्यक्षिके घेतली. सातारा नगरवाचनालय व योगविद्या धाम यांच्यावतीने पाठक हॉलमध्ये दि. 20 जून रोजी योग प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. तर दि.21 जून रोजी सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय, रहिमतपूर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, भुईंज येथेही योगवर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त मैत्रिय योगच्या प्रत्येक उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळला असल्याची माहिती अपर्णा शिंगटे यांनी दिली. स्वस्थ शरीर, निरोगी मनासाठी नियमित योगाभ्यास, व्यायाम यांचा अंगीकार व्हायला हवा त्यासाठी मैत्रिय योग, कनिष्क मंगल कार्यालय समोर, पूर्वा ज्येष्ठा नागरिक संघ हॉल, सदर बझार सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहनही अपर्णा शिंगटे यांनी केले आहे.

Back to top button