पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 17 जूनला जाहीर होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कलागुणांच्या प्रस्तावास मुदतवाढ दिल्यामुळे आणि विद्यार्थ्यांचे कलागुण निकालात समाविष्ट करायचे असल्यामुळे निकालास थोडा उशीर होत आहे.
राज्य मंडळाच्या नऊ विभागांपैकी अद्यापही दोन विभागांचे काही काम शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे निकालासंदर्भात युध्दपातळीवर काम सुरू आहे. जर काम वेळेत पूर्ण झाले, तर येत्या 17 तारखेला निकाल लागण्याची दाट शक्यता आहे; अन्यथा निकाल जास्तीत जास्त 22 तारखेपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख सांगता येणार नाही. मात्र, निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच निकाल जाहीर करण्यात येईल. राज्य मंडळाकडून प्रसिध्दिमाध्यमांव्दारे निकालाची अधिकृत तारीख स्पष्ट केली जाईल असे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, यांनी सांगितले.
हेही वाचा