पुणे

तीन लाख जणांना ‘बूस्ट’ची गरज; बूस्टर डोसकडे दुर्लक्ष

अमृता चौगुले

नरेंद्र साठे

पुणे: कोरोना प्रतिबंधक लसीकरण मंदावले आहे. दुसरा डोस रांगा लावून घेतला गेला, परंतु दक्षता डोसला (बूस्टर) पात्र असलेल्या 3 लाख 85 हजार 529 पुणेकरांनी लस घेतलेली नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यांनी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. पुणे शहरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. महापालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे शंभर टक्के लसीकरण आवश्यक असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस 38 लाख 58 हजार 201 जणांनी, तर दुसरा डोस 32 लाख 25 हजार 254 जणांनी घेतला आहे. म्हणजे दुसरा डोस घेणार्‍यांमध्ये अद्याप सुमारे सहा लाख जण बाकी आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

तिसर्‍या लाटेच्या कालावधीत लसीकरणाची केंद्रे वाढविण्यात आली. जनजागृती आणि कोरोनाची भीती यामुळे नागरिकांनी केंद्रांवर गर्दी केली. सकाळपासूनच लसीकरण केंद्रांवर गर्दी होत होती. लसीचा तुटवडा भासत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मात्र ही गर्दी ओसरली. महापालिकेला केंद्रे कमी करावी लागली. सध्याची मात्र नागरिकांच्या सोयीसाठी ऑफलाईन सुविधा देऊनही म्हणावा त्या प्रमाणात लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही.

दक्षता (बूस्टर) डोस कुणाला मिळतो

18 वर्षांपुढील नागरिक दक्षता डोस घेऊ शकतात. लसीचा दुसरा डोस घेऊन 9 महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला असेल तर हा डोस घ्यावा.

येथे मिळेल डोस…

महापालिकेच्या 68 दवाखान्यांमध्ये दक्षता डोसची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी केवळ 60 वर्षांच्या पुढील व्यक्ती, हेल्थ केअर वर्कर, फ—ंट लाईन वर्कर यांनाच ती उपलब्ध आहे. 18 ते 60 वयोगटातील व्यक्तींना दक्षता डोस खासगी रुग्णालयामधील केंद्रावर घ्यावा लागणार आहे.

दक्षता डोस का दिला जात आहे…

कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही लसीमुळे शरीरात तयार झालेली रोगप्रतिकार शक्ती कमी होत असल्याचे समोर आले. लसीची परिणामकारकता कायम ठेवण्याच्या उद्देशाने बूस्टर डोस दिला जात आहे.

पुन्हा जनजागृतीची गरज…

जास्तीत जास्त नागरिकांनी दक्षता डोस घेण्यासाठी महापालिकेने व्यापक स्वरूपात जनजागृती करणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने ज्येष्ठांसह इतर पात्र नागरिक पुन्हा लस घेण्याकडे वळू शकतात. त्याचबरोबर दुसर्‍या डोससाठी सध्या सुरू असलेल्या हर घर दस्तक मोहिमद्वारे जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर देणे आवश्यक आहे.

दक्षता डोससाठी पात्र असलेल्या सर्व नागरिकांनी लवकर लस घ्यावी. दुसरा डोस बाकी असलेल्यांनीदेखील लस घ्यावी.

          डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे मनपा

हेही वाचा

SCROLL FOR NEXT