बसवराज होरट्टी यांची ऐतिहासिक कामगिरी ; आठव्यांदा विजयी | पुढारी

बसवराज होरट्टी यांची ऐतिहासिक कामगिरी ; आठव्यांदा विजयी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  विधान परिषद सभापती आणि भाजप उमेदवार बसवराज होरट्टी यांनी ऐतिहासिक कामगिरी बजावताना आठव्यांदा विजय संपादन केला. गेल्या 42 वर्षांपासून ते पश्‍चिम शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असून 76 वर्षीय होरट्टी यांचा पक्ष बदलानंतरही करिष्मा कायम असल्याचे दिसून आले. हा ऐतिहासिक विजय असून देशपातळीवर विक्रम आहे. त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी गुलाल उधळून जल्‍लोष केला.

पश्‍चिम मतदारसंघात एकूण 15,583 मतदान झाले होते. त्यापैकी 1223 मते अवैध ठरली. 14,360 पैकी होरट्टी यांना 9,266 मते मिळाली. तर काँग्रेस उमेदवार बसवराज गुरीकार यांना, 4592 आणि निजद उमेदवार एस. एन. गिडगिन्‍नी यांना अवघी 273 मते मिळाली. या विजयानंतर बसवराज होरट्टी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आजपर्यंत 42 वर्षे मी एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आलो आहे. कारकिर्दीवर कोणताही डाग लागणार नाही, याची काळजी घेतली. त्यामुळेच शिक्षकांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला आहेे.

होरट्टी हे माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे जवळचे होते. त्यांनी निजद?काँग्रेस आणि निजद?भाजप सरकारच्या वेळी शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते विधान परिषद सभापती म्हणून काम पाहात आहेत. पण, त्यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ समाप्‍त होताच त्यांनी भाजपमध्ये डेरा दाखल केला. भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि ते पुन्हा विजयी झाले.

Back to top button