पुणे

तळजाईच्या जंगलात मोरांची अन्न-पाण्यासाठी वणवण!

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तळजाई टेकडीवरील तब्बल 205 हेक्टरातील जंगलात आता वाळलेली झाडे दिसत आहेत. नैसर्गिक पाण्याचे स्रोत उन्हामुळे आटल्याने कृत्रिम पाणवठेही त्यांना कमी पडत आहेत. काही पाणवठे गळके असल्याने मोरांना अन्न अन् पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करावी लागत आहे. तळजाई टेकडीवरील सुमारे 205 हेक्टर परिसरात आता विरळ जंगल उरले आहे. माणसांचा जास्त वावर या परिसरात वाढल्याने अन्य कोल्हा, ससा, साळींदर इतरत्र निघून गेले. आता मात्र या जंगलात फक्त मोर अन् लांडोर यांचा अधिवास दिसून येतो. मात्र, उन्हाळा लागताच हे जंगल शुष्क अन् कोरडे झाल्याने मोरांना खाद्य अन् पाणी मिळत नाही. जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने प्राण्यांना आता कृत्रिम पाणवठ्यावरच आपली तहान भागवावी लागते.

पाणवठे शोधताना होते दमछाक

या जंगलातील 205 हेक्टर परिसरामध्ये दहा ते पंधरा कृत्रिम पाणवठे आहेत. मात्र, तेही कमी पडत आहेत. कारण, काही पाणवठे गळके आहेत. त्यात पाणी भरले की ते जमिनीत झिरपून जाते. त्यामुळे पहाटे आणि सायंकाळी शहरातील बहुसंख्य नागरिक पक्षी, प्राण्यांसाठी खाऊ आणतात. यात ज्वारी, बाजरी, तांदूळ असे खाद्य ते मोरांना टाकतात. माणसांची गर्दी कमी झाली की ते खाद्य शोधत मोर येतात.

बाष्पीभवनाचा वेग वाढला

काही कृत्रिम पाणवठे गळके आहेत. तेथील पाणी काही मिनिटांत गायब होते. मात्र, जे पाणवठे पाईपच्या साहाय्याने भरले जातात. ते पाणी सायंकाळपर्यंत प्राण्यांना पुरत नाही. दुपारीच त्याचे बाष्पीभवन होऊन जाते.

एकाच वनरक्षकावर भार

हे टेकडीवरचे जंगल म्हणजे संरक्षित जंगल आहे. या ठिकाणी कुणालाही प्रवेश दिला जात नाही. मात्र, नागरिकांच्या रेट्यामुळे इथे जंगलात प्रवेश मिळाला. पूर्वी एक रुपया तिकीट जंगलात फिरायला जाणार्‍यांना होते. मात्र, ते रद्द करून प्रवेश मोफत केला आहे. एवढ्या मोठ्या 205 हेक्टरचा भार फक्त एका वनरक्षकावर आहे.

नागरिकच करतात अन्न-पाण्याची सोय

हे जंगल पहाटे 5 वाजता खुले केले जाते. शेकडो नागरिक रोज फिरायला येतात. त्यातील काही निसर्गप्रेमी फक्त झाडांची, तर काहीजण पक्षी अन् प्राण्यांसाठी खाद्य घेऊन येतात.

तळजाईचे जंगल 205 हेक्टरमध्ये पसरले आहे. तेथे मोर, लांडोर, ससे असे प्राणी आजही मोठ्या संख्येने आहेत. या क्षेत्रासाठी एकच वनपाल आहे. कृत्रिम पाणवठ्यात कमी पाणी भरते. कारण, पाणी सर्वच प्राण्यांना सहजतेने पीता यावे, हा त्यामागचा उद्देश आहे. पाणी संपले की ते वारंवार भरले जाते. सर्वंच तळी चांगली असून, एकही गळके नाही. तसे असेल तर पाहणी करून ती दुरुस्त करू.

– प्रदीप संकपाळ, वनक्षेत्र अधिकारी.

मी गेल्या पंचवीस वर्षांपासून या जंगलात रोज फिरायला येतो. पूर्वी खूप प्राणी होते. आता जंगल विरळ झाल्याने ते नाहीसे झाले. पण मोर आणि लांडोर अजूनही मोठ्या संख्येने जंगलात आहेत. त्यांना अन्न-पाणी मिळत नाही. अक्षरशः त्यांची भटकंती सुरू असते. नागरिक अन्न घालतात त्यावरच त्यांची गुजराण होते. वनविभागाने मुबलक पाणी आणि अन्न उपलब्ध करून दिले पाहिजे.

– गणेश शहाणे, ज्येष्ठ नागरिक.

आम्ही दर रविवारी जंगलातील कचरा गोळा करतो. यात प्लास्टिकच्या बाटल्यासह मोठमोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या या ठिकाणी सापडतात. वेळ मिळेल तेव्हा आम्ही मोरांसाठी खाद्य आणतो. कोरड्या हौदात पाणी भरतो. इथे मोर- लांडोर मोठ्या संख्येने आहेत. यंदा उन्हाचा दाह खूप आहे. जंगल वाळले आहे. अन्न-पाण्यासाठी रोज मोठी भटकंती होत आहे.

– मानसी पाटील, विद्यार्थिनी.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT