पुणे

टिळक, जगताप यांनीही केले मतदान; राज्यसभा निवडणुकीसाठी अ‍ॅम्ब्युलन्समधून जाऊन बजावला हक्क

अमृता चौगुले

पिंपरी/पुणे, पुढारी वृत्तसेवा: आमदार लक्ष्मण जगताप व आमदार मुक्ता टिळक सध्या आजारी आहेत. असे असतानाही राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्समधून मुंबईला जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जून ला मतदान झाले. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.

सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये अटीतटीची लढत आहे. मतदानासाठी सर्व पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल झाले. एकही आमदार बाहेर राहू नये किंवा मत वाया जाऊ नये, यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न करण्यात येत होते. चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आजाराने त्रस्त असल्याने ते मतदान प्रक्रियेत सहभागी होणार की नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

अखेर ते रुग्णवाहिकेतून मुंबईसाठी रवाना झाले व त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यासंदर्भात आ. जगताप यांचे बंधू, माजी नगरसेवक शंकर जगताप म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांची प्रकृती ठीक असेल तरच या, असे सांगितले होते.

आम्ही लक्ष्मणभाऊ यांना निरोप दिल्यानंतर त्यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला पक्षाला माझी गरज असून, मी प्रवास करू शकतो, असे सांगितले. तसेच निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. हवामान बदलामुळे डॉक्टरांनी एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा पर्याय नाकारला. कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्समधून आ. जगताप मुंबईला रवाना झाले.

आमदार मुक्ता टिळक पोहोचल्या रुग्णवाहिकेतूनच

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक राज्यसभा निवडणुकीसाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन बुधवारीच मुंबईत पोहोचल्या होत्या. मात्र, मुंबईत पोहोचल्यावर त्रास होऊ लागल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्या शुक्रवारी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी रुग्णवाहिकेतूनच विधान भवनात दाखल झाल्या आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT