पुणे

जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांचे मूल्यमापन; 385 पैकी 182 मुख्याध्यापक नापास

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील निवडलेल्या एकूण शाळांमधील 385 पैकी 182 मुख्याध्यापक विविध प्रकारच्या सादरीकरणामध्ये नापास ठरले आहेत.आता शिक्षकांसह मुख्याध्यापकांची कमतरता जाणून घेऊन त्यांना उत्तम प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांसह मुख्याध्यापकांची प्रगती जाणून घेण्यासाठी शाळा सुधार कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेने चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

त्या परीक्षेची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे (डाएट) सोपविण्यात आली होती. त्यांच्या वतीने शिक्षकांची 40 गुणांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील 410 पैकी 400 शाळांच्या मुख्याध्यापकांकडून माहितीचे सादरीकरण करण्यात आले. त्या सादरीकरणानंतर 'डाएट'ने एका समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांचेही मूल्यमापन केले. त्यापैकी 182 मुख्याध्यापकांनी विविध मुद्द्यांच्या आधारे सादरीकरण करण्यात ते 'नापास' ठरले आहेत.

गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशिक्षण देणार

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, 'जिल्हा परिषदेने शाळेच्या शिक्षकांसह मुख्याध्यापकांचे मूल्यमापन केले आहे. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता तसेच अन्य जबाबदार्‍यांचे मूल्यमापन केले. त्यात ते कुठे कमी पडतात, याची तपासणी करण्यात आली. त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मूल्यमापनाद्वारे शिक्षक आणि मुख्याध्यापकांना कमी लेखण्याचा उद्देश नाही.'

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT