पुणे

जारमधील पाण्याला वालीच नाही ; एफडीए म्हणते अधिकारच नाहीत पालिका म्हणते संबंध नाही

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पिण्याचे पाणी शुद्ध असणे आरोग्यास आवश्यक असते. पुण्याच्या उपनगरांमध्ये मात्र जारद्वारे होणारा पाणीपुरवठा हा शुद्ध आहे का, हे तपासण्याची कुठलीच व्यवस्था कोणत्याच पातळीवर आढळत नाही. शिवाय त्यावर नेमके कुणाचे नियंत्रण आहे, याबाबतदेखील संदिग्धता आहे. या सर्वांमध्ये नागरिकांपर्यंत पिण्यास अयोग्य असलेले पाणी तर पोहचत नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.

सध्या पाण्याच्या या थंड जार वाटपावर कोणत्याच शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. विविध समारंभांमध्ये थंड पाण्यासाठी जारचा सर्वच ठिकाणी वापर केला जातो. ऑर्डर देणारी व्यक्ती पाणी घेऊन येणार्‍याचे पाणी तपासून घेईल, याची काहीच खात्री नाही. त्यामुळे आपण पित असलेले पाणी शुद्ध की अशुद्ध हे ठरवणेच कठीण आहे.

तर काही जार व्यावसायिकांनी सांगितले की, आम्ही सर्व नियमांचे काटेकोर पालन करतो. पाणी फिल्टर करून त्याचा टीडीएस योग्य प्रमाणात राहील ते पाहिले जाते. याशिवाय प्रमाणित प्रयोगशाळेकडून वर्षातून एकदा पाणी तपासणी करून त्यांच्याकडून शुद्धतेचे प्रमाणपत्र घेतो. मात्र, काही थोडे व्यावसायिक या गोष्टी पाळत नाहीत, हेही वास्तव आहे.

रोज अनेक पुणेकर हे पाणी पितात. त्यात उपनगरामध्ये हे प्रमाण अधिक आहे. टेम्पोमध्ये जार भरून त्याची वाहतूक करतानाचे चित्र आपल्याला नेहमी दिसते. परंतु हे पाणी कुठे भरतात, ते कसे भरतात, त्याची गुणवत्ता काय, या प्रश्नाचे उत्तर सध्या शासकीय अधिकार्‍यांकडे नाही. बाटली बंद पाणीपुरवठा करणारी शहरात एक यंत्रणा आहे.

बाटली बंद पाण्याची तपासणी करून अशुद्ध असल्यास अन्न व औषध प्रशासन कारवाई करते. मात्र, जारच्या बाबतीत नाही. जारमध्ये रोजच्या रोज पाणी पोचविणारी व्यवस्था आहे. पाण्याचे जार मंगल कार्यालये, ऑफिस, छोट्या दुकानांमधून रोज भरून पोहोचवण्याची सुविधा हे व्यावसायिक देतात. रिकामे जार घ्यायचे आणि त्या जागी पाण्याने भरलेले जार ठेवायचे, अशी ही व्यवस्था आहे.

'आमच्यातील काही जण पाण्याबाबत हलगर्जीपणा करत असतील. पण, ते थोडे आहेत. त्यांच्यामुळे सर्वांनाच त्रास होतो. त्यामुळे आम्हाला अधिकृत परवाने द्यावेत. अधिकार्‍यांनी आमच्या पाण्याची तपासणीही करावी. आम्ही नागरिकांना शुद्ध पाणी देत आहोत,' असे म्हणणे एका जार विक्रेत्याने मांडले.

आम्ही सीलबंद पाण्याच्या बाटल्यांबाबत कारवाई करतो. पाण्याचे नमुने घेऊन संबंधितांवर कारवाई आमच्याकडून नेहमी सुरू असते. कूल जारमधून विक्री होणारे पाणी पॅकेज ड्रिंकिंग वॉटरमध्ये येत नाही. त्यामुळे त्यावर 'एफडीए'ला नियंत्रण ठेवता येत नाही.
– संजय नारागुडे, सहायक आयुक्त,
अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग

जारच्या पाण्याचा विषय हा महापालिकेच्या अधिकारात येत नाही. त्यामुळे त्याबाबत तपासणी किंवा कारवाईचा विषयच येत नाही.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT