पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'मातृभूमीसाठी प्राणार्पण करण्याची शिकवण आपल्या देशातच दिली जाते. देश पारतंत्र्यात असताना अनेक क्रांतिकारांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आणि देशासाठी बलिदान दिले. देशासाठी बलिदान देणार्या प्रत्येक क्रांतिकाराचे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते,' असे प्रतिपादन कीर्तनकार मोरेश्वर जोशी-चर्होलीकर यांनी केले.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमहागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यास आणि शिवतीर्थनगर श्रीगणपती मंदिर ट्रस्टतर्फे सातदिवसीय क्रांतिकारक चरित्र कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन महोत्सवाची सुरुवात जोशी-चर्होलीकर यांच्या कीर्तनाने झाली. जोशी-चर्होलीकर म्हणाले, 'संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरणारा इतिहास आजच्या काळात शिकवला जात नाही. आपली पुढील पिढी अयोग्य संकल्पनांच्या आहारी जाऊन पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करीत अयोग्य मार्गावर जात आहे.
त्यांना भारतीय संस्कृतीचा विसर पडला आहे. सद्य:स्थितीत भारतावर आणि भारतीय जनतेवर सर्वच बाजूंनी शैक्षणिक, सांस्कृतिक अतिक्रमण होत असताना शिक्षकांनी कर्तव्यभावनेतून नवीन पिढीला क्रांतिकारकांचा इतिहास माहिती करून द्यावा तसेच क्रांतिकारांचे विचार, साहित्य या पिढीपर्यंत पोहचवून योग्य मार्गदर्शन करावे.' त्यांना रंगनाथ कुलकर्णी (तबला) आणि माधव फळणीकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. शिवतीर्थनगर श्रीगणपती मंदिर ट्रस्टचे शशिकांत सुतार यांनी प्रास्ताविक केले. बळीराम कदम यांनी सूत्रसंचालन केले.
हेही वाचा