पुणे

चैत्री पौर्णिमेनिमित्त जेजुरीत भाविकांची गर्दी : खंडोबा देवाला दवण्याची पूजा

Laxman Dhenge

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चैत्री पौर्णिमा यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी देवदर्शन व कुलधर्म कुलाचाराचे धार्मिक विधी करण्यासाठी जेजुरी गडावर गर्दी केली होती. चैत्री शुद्ध पौर्णिमेला दुसर्‍या प्रहरी, चित्रा नक्षत्र, वसंत जित ऋतू या शुभदिवशी श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला. तेव्हापासून दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला जेजुरीनगरीत मोठी यात्रा भरते. विशेषत: या यात्रेला बहुजन बांधव व शेतकरी मोठ्या संख्येने येतात.

मंगळवारी पहाटे नित्य पूजा व अभिषेक झाल्यानंतर देवाला प्रिय असणार्‍या दवण्याची पूजा घालण्यात आली. चैत्री पौर्णिमा यात्रेनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी देवदर्शनासाठी जेजुरी गडावर रांगा लावल्या होत्या. भाविकांकडून कुलधर्म कुलाचार करत 'येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट,' असा खंडोबा देवाचा जयजयकार केला. देवदर्शनाबरोबरच तळीभंडार, भंडार-खोबर्‍याची उधळण, जागरण गोंधळ असे विधी कार्यक्रम गडावर भाविक करत होते.

चैत्र षडोरात्र उत्सवानिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या जेजुरीच्या खंडोबा देवाला दवणाची पूजा घालण्यात आली. दवणा ही सुगंधी वनस्पती असून, ती देवाला प्रिय आहे. खंडोबा देवाला दवणा अर्पण करण्याची परंपरा आहे. चैत्री पौर्णिमेला दरवर्षी भाविकांची संख्या मोठी असते. मात्र, या वर्षी असणारी दुष्काळाची भीषणता, पाण्याची टंचाई, रखरखते ऊन, निवडणुकीचे वारे यामुळे भाविकांची संख्या कमी होती.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT