पुणे

चुकीची माहिती देऊन टाकली जाते भुरळ : पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातील विकासदर जेवढा होता, तेवढा विकासदर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात राहिला असता तर आपली अर्थव्यवस्था आज जगात तिसर्‍या नंबरवर गेली असती. मात्र, सध्या अर्थव्यवस्थेचा दर घसरला आहे. लोकांना चुकीची माहिती देऊन भुरळ टाकण्याचे काम मोदी करीत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच, ईडी सीबीआयच्या धाडी टाकून मोदी सरकारने मोठ्या कंपन्या व व्यक्तींना भीती दाखवत निवडणूक रोख्यांच्या नावाखाली पैसा गोळा केल्याचाही आरोप चव्हाण यांनी केला.

काँग्रेस भवन येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. या वेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, दहा वर्षांत काय केले, याची श्वेतपत्रिका काढावी; म्हणजे 2014 पूर्वी आणि नंतर काय झाले, याची तुलना करता येईल. दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. दहा वर्षांत 20 कोटी लोकांना रोजगार मिळायला हवा होता. मात्र, काहीच झाले नाही. उलट देशात बेरोजगारी वाढली.

डिझेल व पेट्रोलचा भाव 35 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? याचा अहवाल मोदींनी तयार करावा, असेही चव्हाण म्हणाले. राज्यात आर्थिक व नैतिक भ्रष्टाचार आहे. फोडाफोडीचा लोकांना राग आलेला आहे. आमदार तिकडे गेलेले असले तरी जनता गेलेली नाही. तसेच सत्तर हजार कोटींचा सिंचन गैरव्यवहार आणि आदर्श घोटळा कसा काय माफ केला जाऊ शकतो? ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले, त्यांच्या मांडीला मांडी लावून सध्या ते प्रचार करीत असल्याची टीकाही चव्हाण यांनी या वेळी केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT