पुणे

गुजराती केशरची पुण्याकडे पाठ; स्थानिक बाजारपेठांमध्येच आंब्याला चांगले दराचे परिणाम

अमृता चौगुले

शंकर कवडे

पुणे : लहरी हवामानामुळे उत्पादनात घट झाल्याने गुजरातच्या स्थानिक बाजारपेठांमध्येच केशर आंब्याला चांगले दर मिळू लागले आहेत. त्यामुळे गुजरातच्या केशर आंब्याने पुण्यातील बाजारपेठांकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. कोकणातील हापूस तसेच कर्नाटकातील आंब्याचा हंगाम आटोपल्यानंतर मार्केट यार्डातील फळबाजारात गुजरात येथून केशरची आवक होण्यास सुरुवात होते. अन्य आंब्याच्या तुलनेत जास्त टिकाऊपणा असलेल्या केसरला पुणेकरांकडून मोठी मागणी असते.

यंदा मात्र गुजरातमध्ये अवकाळी पाऊस, तापमानात झालेली वाढ या सर्वांचा परिणाम म्हणून केसरच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी, गुजरात येथून स्थानिक बाजारपेठांमध्ये केशरला मागणी जास्त आहे. सध्या गुजरातमधील घाऊक बाजारात कच्च्या केशरच्या प्रतिकिलोला 55 रुपये भाव मिळत आहे. तर, पुण्यातील बाजारपेठामध्ये स्थानिक भागातून येणार्‍या कच्च्या केशरच्या प्रतिकिलोला 50 ते 70 तर तयार केशरला 70 ते 100 रुपये किलो दर मिळत आहे.

गेल्या काही महिन्यांत इंधनदरात मोठी वाढ झाल्याने गुजरात येथून पुण्यातील बाजारात आंबा विक्रीसाठी पाठविणे शेतकर्‍यांसह व्यापारी वर्गासाठी खर्चीक बनले आहे. गुजरात येथून आंबा पाठविला तरी स्थानिक आंब्याचे तुलनेत त्याचे दर जास्त राहणार असल्याने गुजराती केशर पुणेकरांना परवडणार नाही. त्यामुळे पुण्यातील बाजारपेठांमध्ये आंबा पाठविण्याऐवजी शेतकर्‍यांनी स्थानिक बाजारपेठांमध्येच आंबा विक्रीला प्राधान्य दिल्याचे आंबा व्यापार्‍यांनी सांगितले.

बाजारपेठेत आंबा न येण्याची कारणे
लहरी हवामानामुळे केशरच्या उत्पादनात मोठी घट
कॅनिंग कंपन्यांनी चढ्या दराने सुरू केलेली खरेदी
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ
स्थानिक भागातून मोठ्या प्रमाणात आंब्याची झालेली आवक

आंबा : केशर, उत्पादक क्षेत्र : वापी, कच्छ, जुनागढ, धरमपूर, वलसाड
मिळणारा दर : सरासरी 30 ते 80 रुपये प्रतिकिलो

पुणे जिल्ह्यातील भोर, वमावळ, मुळशी, जुन्नर आदी भागांतून केशर आंबा मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. त्यांच्या प्रतिकिलोला 50 ते 70 रुपये दर मिळत आहे. गुजरातमध्ये जागेवरच दर चढे असल्याने शेतकरी पुण्यात आंबा पाठविण्यात उत्सुक नाही. परिणामी, यंदा बाजारात गुजरातची आवक झालीच नाही.

                        – युवराज काची, केशर आंबाविक्रेते

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT