केडगाव चौफुला येथे पडलेला पाऊस. (छाया : विजय चव्हाण)  
पुणे

केडगाव चौफुलाला धुवाधार पावसाची हजेरी

अमृता चौगुले

केडगाव : पुढारी वृत्तसेवा: यवत दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामाहून निघालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तालुक्यातील दुसर्‍या मुक्कामाला वरवंड येथे जात असताना भांडगावची घटकाभराची विश्रांती घेतल्यावर सोहळ्याला धुवाधार पावसाने झोडपून काढले. पुढील विसाव्यासाठी पालखी चौफुला (बोरीपार्धी) या ठिकाणी निघाली होती. या वेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस वारकर्‍यांना त्रासदायक ठरला असला, तरी तालुक्यातील शेतकर्‍यांना मात्र फायदेशीर ठरणार आहे. साधारण दुपारी तीनच्या सुमारास पालखी चौफुला विसाव्याला विसावली. या वेळी गावचे सरपंच सुनील सोडनवर, उपसरपंच ज्योती मगर, सदस्य शेखर सोडनवर, ग्रामसेवक सयाजी क्षीरसागर आणि अन्य सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यवत ते वरवंड यादरम्यान पालखीचा प्रवास पावसाने रंगतदार केला. पुणे-सोलापूर महामार्गाच्या रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या स्थानिक भाविकांना पावसाच्या फटकार्‍याने आश्रय शोधण्यासाठी पळापळ करावी लागली. वारकरी आणि भाविकांच्या गर्दीचा झालेला महामार्ग काही क्षणात मोकळा दिसू लागला. चौफुला परिसरात साधारण अर्धा तास झालेल्या पावसाने सर्वांची दाणादाण उडवली. टाळ-मृदंगांचा नाद पावसाने घटकाभर थांबला असला, तरी 'पुंडलिका वरदे हरी विठ्ठल' नामाचा गजर चिंब भिजलेल्या वारकर्‍यांनी देऊन पालखीबरोबर दिंडीतील वैष्णवांमध्ये नवचैतन्य भरलेले दिसून आले. चौफुला या ठिकाणी विसाव्याच्या थांब्यावर दर्शनासाठी जमलेले परिसरतील भाविक अचानक आलेल्या पावसाने भिजून गेले. संथगतीने निघालेल्या तुकोबांच्या पालखीवर वरुणराजाने स्वागत करण्यासाठी जणू वेळच साधली, अशी भाविकांमध्ये चर्चा होती. तालुक्यामध्ये पालखीच्या आगमनानंतर हा पहिलाच मोठा पाऊस होता.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT