पुणे

कर्नाटक जांभळे पथ्यावर; स्वस्त असल्याने पल्प उद्योगासाठी उद्योजकांकडून खरेदी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मार्केट यार्डातील फळबाजारात कर्नाटकातून जांभळांची आवक सुरू झाली आहे. पावसाचा तडाखा बसून दर्जा खालावल्याने जांभळांचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. पल्पसाठी लागणार्‍या कोकणातील जांभळांच्या तुलनेत ही जांभळे स्वस्त पडत असल्याने पल्प उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात कर्नाटकातील जांभळांची खरेदी सुरू केली आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात कर्नाटकातील हुबळी, चित्रदुर्ग, कोकपाल आदी भागातून जांभळांची आवक सुरू झाली आहे. येथून दोन टेम्पोमधून दररोज सरासरी शंभर ते दीडशे डागांची बाजारात आवक होत आहे. यंदा लहरी हवामानामुळे सर्व ठिकाणच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे, एरवीच्या तुलनेत जांभळांचे भाव चढेच आहेत.

सध्या घाऊक बाजारात किलोला 70 ते 120 रुपये भाव मिळत आहे. कर्नाटक परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे जांभळांवर डाग पडले आहेत. बाजारात तब्बल ऐंशी टक्के मालाला पावसाचा फटका बसला असून वीस टक्के माल चांगल्या प्रतीचा आहे. निम्म्याहून अधिक मालाची प्रत खालावल्याने किरकोळ विक्री करणार्‍यांकडून कर्नाटकातील जांभळांच्या खरेदीला ब्रेक लागला आहे.

बाजारात उपलब्ध असलेल्या कर्नाटकातील जांभळांना मागणी नसल्याने त्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत, याचा फायदा घेत शहरातील पल्प उद्योजकांचा कर्नाटकातील जांभळे खरेदी करण्याकडे कल वाढला असल्याचे व्यापारी भूषण भोसले यांनी सांगितले.

स्थानिक जांभळांची गोडी; दर्जा, दर कायम

बाजारात बारामती, निरा, सातारा व पुणे शहरालगतच्या भागातून जांभळे उपलब्ध आहेत. ही जांभळे दर्जेदार असल्याने त्यांना मागणीही चांगली असून, किलोला 120 ते 200 रुपये दर मिळत आहे, तर किरकोळ बाजारात 300 ते 350 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. ही जांभळे पांढरट गराची, चवीला गोड असल्याने याला स्टॉलधारक, हातगाडीवाले यांच्याकडून मोठी मागणी आहे.

कोकणातील जांभळाचे दर उतरले

कोकणातील गोडीला कमी तसेच गडद निळसर रंगाच्या जांभळाच्या खरेदीला पल्प उद्योजकांकडून प्राधान्य दिले जाते. उत्पादन कमी असल्याने कर्नाटक जांभूळ येण्यापूर्वी या जांभळांच्या किलोचे दर 120 ते 200 रुपयांवर पोहोचले होते. कर्नाटकची आवक सुरू झाल्यानंतर या जांभळांना किलोला 70 ते 120 रुपये दर मिळाला. कोकणच्या तुलनेत ही जांभळे किलोमागे 50 ते 80 रुपये स्वस्त पडत असल्याने उद्योजकांनी त्याच्या खरेदीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे, कोकणच्या जांभळांच्या मागणीत घट होऊन दरात किलोमागे 20 रुपयांनी घसरण होऊन दर 100 ते 180 रुपयांवर पोहोचले.

कर्नाटकातील जांभळांचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. 15 दिवस तो सुरू राहील.उत्पादन कमी असल्याने पावसाचा फटका बसूनही चांगला दर मिळत आहे.
  – सागर भोसले, जांभळाचे व्यापारी

SCROLL FOR NEXT