पुणे : कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता धोक्यात आणणार्या गुंडांवर वचक निर्माण करण्यासाठी तसेच त्यांची गुन्हेगारी व भाईगिरी मोडीत काढण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडून 'एमपीडीए'चा प्रभावी वापर करण्यात येत आहे. नऊ वर्षांत सुमारे 170 सराइतांना स्थानबद्ध करून तुरुंगाची हवा खाण्यासाठी पाठविण्यात आले आहे.
पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गंभीर गुन्ह्यांत सहभागी असणार्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांकडून गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली. त्यानुसार गुन्हेगारांना झोपडपट्टी दादा निर्मूलन कायदा – महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी अॅक्टअंतर्गत (एमपीडीए) राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये स्थानबद्ध करण्यात येत आहे.
गुप्ता यांनी आतापर्यंत 2021 मध्ये 46, तर चालू वर्षातील पाच महिन्यात 15 सराइतांवर 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई केली आहे.
राज्यातील विविध कारागृहांत रवानगी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील अनेक गुंड एकाच कारागृहात न ठेवता त्यांची रवानगी राज्यातील विविध कारागृहांत केली. दोन वर्षांत गुप्ता यांनी तब्बल 67 गुंडांवर 'एमपीडीए'ची कारवाई केली. नऊ वर्षांच्या कालावधीत 'एमपीडीए'खाली सर्वाधिक कारवाया केल्याचेही दिसून येते.
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगारांच्या विघातक कृत्यास आळा घालण्यासाठी अधिनियम 1981 म्हणजेच 'एमपीडीए' कायद्याचा वापर केला जातो. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केली जाते. त्याला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द केले जाते. या कायद्याच्या प्रभावी वापरामुळे गुन्हेगारावर मोठा वचक निर्माण करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.
नागरिकांना मारहाण, खून, खंडणी, शस्त्रांचा धाक दाखवून लुबाडणे, जाळपोळ, तोडफोड, हातभट्टी दारू विकणे तसेच अवैध धंदे बळाच्या जोरावर चालविण्यासारखे गंभीर गुन्हे गुंड व गुन्हेगारांकडून केले जातात. त्यांच्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होतो. सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानासदेखील ते कारणीभूत ठरतात. अशा दादा-भाईंची नागरिकांमध्ये दहशत असते. त्यामुळे नागरिकही तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. अशावेळी पोलिसांकडून 'एमपीडीए'अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाते.
हेही वाचा