पुणे

उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वेगाड्या ‘हाऊसफुल्ल’; स्लीपर डबे बनताहेत जनरल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वेच्या नियोजित आणि विशेष गाड्यादेखील हाऊसफुल्ल होऊन धावत आहेत. स्टेशन सोडल्यावर काही वेळातच गर्दीमुळे स्लीपर डबे अक्षरश: जनरल डब्यांचे रूप घेत आहेत, यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांना नाहक त्रास होत आहे, याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता अतिरिक्त यंत्रणा आणि अतिरिक्त विशेष गाड्यादेखील सोडल्या आहेत.

मात्र, या विशेष गाड्यादेखील फुल्ल भरून जात आहेत. यात मुख्यत्वे करून बिहार, उत्तर प्रदेशातील गाड्यांना अधिक गर्दी आहे. यासह अन्य भागांतील नियोजित गाड्यादेखील फुल्ल भरून जात आहेत. परिणामी, गाडी सुटणारे मुख्य स्थानक सुटल्यावर लांबपल्ल्याच्या रेल्वे गाडीतील स्लीपर डब्यांना जनरल डब्यांचे रूप येत आहे. आरक्षण केलेल्या प्रवाशाच्या जागेवर फुकटे आणि वेटिंगवर असलेले प्रवासी घुसखोरी करत आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे फुकटे तर गाड्यांमध्ये अक्षरश: कहरच करत आहेत.

डब्यातील स्वच्छतागृहामध्ये सुद्धा जाऊन बसत आहेत. त्यासोबतच स्लीपर डब्यातील चालण्याच्या पॅसेजमध्ये देखील फुकटे ठाण मांडून बसत आहेत. स्लीपर डब्यातील प्रवाशांना ये-जा करणे मुश्किल होत आहे. तसेच, महिलांना स्वच्छातागृहात जाणे अवघड होत आहे, याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. यासंदर्भातील अनेक तक्रारी प्रवाशांकडून सोशल मीडियाचे साधन असलेल्या ट्विटरवरून रेल्वे प्रशासनाला केल्या जात आहेत.

फुकट्या घुसखोरांची वाढतेय 'दादागिरी'
रेल्वे प्रशासनाने स्लीपर डब्यांमध्ये होणारी इतर फुकट्या आणि वेटिंगवर तिकीट असलेल्या प्रवाशांची घुसखोरी थांबवावी. त्यामुळे आरक्षण असलेल्या आमच्यासारख्या प्रवाशांना मनस्ताप होत आहे. तसेच, डब्यातील स्वच्छतागृहाकडे जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

– रवि चव्हाण, प्रवासी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT