पुणे

अरविंद शिंदे यांनी स्वीकारला पदभार; जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी शुक्रवारी (दि.10) माजी अध्यक्ष रमेश बागवे यांच्याकडून पदभार स्वीकारला. शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय नवसंकल्प शिबिरामध्ये प्रदेश काँग्रेसने केलेल्या ठरावानुसार शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

बागवे यांच्यासोबतच प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड व रोहित टिळक यांनीही राजीनामे दिले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांची पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
त्यानंतर शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी काँग्रेस भवन येथे माजी शहराध्यक्ष बागवे यांच्याकडून पदभार स्वीकारला.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, अनंत गाडगीळ, अ‍ॅड. अभय छाजेड, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, दत्ता बहिरट आदी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, 'काँग्रेस पक्षाचे काम करीत असताना आजवरच्या माझ्या प्रवासामध्ये अनेकांनी मला साथ दिली आहे.

आत्तापर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ मला अध्यक्षपदाच्या रूपाने मिळाले आहे. पक्षातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने पुणे महापालिकेची आगामी निवडणुक आपण पूर्ण ताकदीने लढवून त्यात उत्तम असे यश नक्की मिळवू.

SCROLL FOR NEXT