पुणे

अभियंता तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: खराडी परिसरात आयटी अभियंता तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग करून अंगावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. दुचाकीस्वाराला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी रोहित शरद माने (वय 27, रा. शास्त्रीनगर, येरवडा) याला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे.

त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, अल्पवयीन साथीदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वाघोली येथील 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही खराडी येथील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करते.

शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारात आपल्या एका सहकार्‍यासोबत चहा पिण्यासाठी येथील चेरील सोसायटीसमोरील रस्त्यावरून पायी चालत निघाली होती. त्या वेळी आरोपी माने हा त्याच्या साथीदारासोबत दुचाकीवरून आला होता. त्याने फिर्यादी तरुणीला जोरात कट मारला. त्याचा जाब तरुणीने त्याला विचारला असता दोघा आरोपींनी रस्त्यात तरुणीला अडविले. हात पकडून मारहाण केली.

स्त्रीमनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग देखील केला. तसेच जोरात तरुणीला खाली ढकलून दिले. या वेळी माने याने तरुणीला अंगावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच अवघ्या 10 मिनिटांत दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT