पुणे : पुढारी वृत्तसेवा: सीबीएसई, आयसीएसई व आयबी बोर्डांचा बारावीच्या परीक्षेचा निकाल अद्याप लागलेला नाही. त्यामुळे प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचा पेच विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई), इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (आयसीएसई) आणि अन्य बोर्डांचे निकाल राज्य मंडळाच्या बारावीच्या निकालाच्या अगोदरच जाहीर होत असतात.
यंदा कोरोनामुळे संबंधित बोर्डातील इयत्ता बारावीच्या परीक्षाच 15 जूनच्या आसपास संपल्या.
त्यामुळे त्यांचा निकाल नेमका कधी लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. याउलट राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल 8 जूनला लागला. तेव्हापासून महाविद्यालयांमध्ये पदवीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सूरू झाली आहे. संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 5 जुलैला लागेल. त्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व जागाही भरल्या जातील. मग इतर बोर्डांचे विद्यार्थी त्यापासून वंचित राहू शकतात, अशी चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा