भामा आसखेड: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निर्णय लांबत चालल्याने इच्छुक उमेदवारांचे खर्च करून अक्षरश: कंबरडे मोडायला लागल्याने अनेकांचे लक्ष कधी निवडणूक लागणार, याकडे लागले आहे. परंतु, अमाप पैसा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवारांकडून मात्र कितीही दिवस निवडणुका लांबल्या, तरी त्यांनी खर्चाची कसलीही तमा न बाळगता नवीन शक्कल लढवीत निवडणुकीचा जातीनिहाय नवीन ट्रेंड समोर आणला आहे.
त्या-त्या वर्गातील लोकांना दर्शनयात्रा घडविण्याचा फंडा सुरू आहे. यामुळे खेड तालुक्यातील काही जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांची दर्शनयात्रा जोरात सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी काढलेल्या दर्शनयात्रेला प्रत्येक वर्गातील मतदारांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे.
जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी तीव इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून गटातील महिलांसह पुरुष मतदारांना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैन येथील महाकालेश्वर व नाशिकच्या र्त्यंबकेश्वराचे तसेच तुळजापूर येथील तुळजाभवानी व कोल्हापूर येथील अंबादेवी व वणीच्या सप्तशृंगी देवी दर्शनयात्रेसह अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज व कोल्हापूरच्या जोतिबाच्या दर्शनाकरिता नागरिकांची तीर्थक्षेत्र दर्शनयात्रा सर्वांसाठी सुरू आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी दलितवस्तीतील नागरिकांना नागपूर दर्शनयात्रा सुरू आहे, तर धनगर समाजातील लोकांना आदमापूर येथील श्रीक्षेत्र बाळूमामाच्या दर्शनासाठी यात्रा सुरू आहेत. मुस्लिम समाजातील लोकांना अजमेरची दर्शनयात्रा घडवली जात आहे. वाफगाव-रेटवडी आणि पिंपळगाव-मरकळ तर नाणेकरवाडी- महाळुंगे गटातील गावचे मतदार दररोज दर्शनयात्रा करीत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रत्येक गटातील नागरिकांची दर्शनयात्रा सुरू असल्याने एकंदरीत निवडणुकीचे वातावरण सध्यातरी दर्शनयात्रेचे दिसत आहे. निवडणुका कधी लागणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. परंतु, मतदारांची मात्र दर्शनयात्रेने चांगलीच चंगळ सुरू आहे.
अनेकांना वाटते निवडणुका जाहीर व्हाव्यात
उज्जैन येथील महाकालेश्वर दर्शनासाठी मतदारांना पाठविण्यासाठी सर्वच इच्छुक उमेदवारांनी ट्रेनचा पर्याय निवडला असून, काही तर लक्झरी बसने देखील मतदारांना नेत आहेत. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हे सर्व पर्याय इच्छुक उमेदवार अवलंबत आहेत. आत्ता निवडणूक लागल्यास अनेक इच्छुकांना सोईचे वाटत आहे. परंतु, निवडणुका जर एप्रिल व मे महिन्यात गेल्या तर खर्च कितपत करावा, याची देखील चिंता त्यांना लागली आहे. मतदारांना सहलीसाठी खर्च करण्याचे थांबवावे तर आत्तापर्यंत खर्च केलेल्याचे काय होणार? असा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडला आहे. त्यामुळे निवडणुका लवकर जाहीर व्हाव्यात, अशीच अपेक्षा सर्व इच्छुक उमेदवारांची आहे.