पुणे: पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट आणि गणांची प्रभागरचना करण्यासाठीचा प्रारुप आराखड्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांतील तहसीलदारांनी आपापल्या तालुक्यांचा आराखडा सादर केला असून तो 14 जुलै रोजी (सोमवार) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेसाठी जिल्हाधिकार्यांना अधिकार देण्यात आले होते. या प्रक्रियेत नोडल अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यानुसार तहसीलदारांनी गट व गणांचे प्रारुप अहवाल सादर केले आहेत. (Latest Pune News)
प्रारुप आराखड्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार असून त्यासाठी 21 जुलैपर्यंत मुदत दिली जाणार आहे. या हरकतींवर 28 जुलैपर्यंत सुनावणी घेण्यासाठी विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्यात येईल.
अंतिम प्रभाग रचना 18 ऑगस्टपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे.2017 साली जिल्हा परिषदेमध्ये 75 गट होते, तर पंचायत समितीत 150 गण होते. नव्या रचनेनुसार आता 73 गट व 146 गण असणार आहेत. हवेली तालुक्यातील सात गट कमी झाले असून जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका गटाची वाढ झाली आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रे, मतदारसंख्या, आवश्यक ईव्हीएम यंत्रे आणि त्यांची स्थिती यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्रे मिळण्याची शक्यता आहे.
आता प्रभाग रचनेचे प्रारुप आराखडा राजपत्रात येत्या 14 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावेळी प्रभाग रचनेचा आराखडा हा हरकती आणि सूचनेसाठी नागरिकांना खुला केला जाणार आहे. त्यावर 21 जुलैपर्यंत जिल्हाधिकार्यांकडे हरकती देण्याची मुदत देण्यात आली आहे.