पुणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने वीर फाटा जेजुरी-सासवड रोडवर कारवाई करीत तब्बल एक कोटी 15 लाखांच्या 57 हजारांहून अधिक गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाकडून वाहतूक करणार्या कंटेनरचालकाच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. धर्मराम सारंग (रा. राजस्थान) असे त्याचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे अधीक्षक कार्यालयाच्या सासवड विभागाने ही कारवाई केली. (Latest Pune News)
गोवा राज्यातून विदेशी मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांना बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सासवड विभागाच्या पथकाने सासवड गावच्या हद्दीत जेजुरी-सासवड रस्त्यावरील वीर फाटा येथे सापळा लावला.
पथकाने एका सहाचाकी मालवाहतूक कंटेनरला पकडून त्याची तपासणी केली. संबंधित कंटेनरमधून विदेशी मद्याची तस्करी होत असल्याचे पथकातील अधिकार्यांना आढळले.
अधिक तपासणी केली असता संबंधित कंटेनरमध्ये गोवा राज्य बनावटीच्या व्हिस्की मद्याच्या 180 मि.ली.च्या बाटल्या असलेले 1204 बॉक्स आढळले. या प्रत्येक बॉक्समध्ये 48 मद्याच्या बाटल्या अशा एकूण 57 हजार 792 बाटल्या पथकाने जप्त केल्या.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने एक कोटी 15 लाखांच्या 57 हजार 400 रुपयांचा मद्यसाठा यासोबतच वाहन, मोबाईल फोन असा एक कोटी 33 लाख 78 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विभागाने संबंधित कंटेनरच्या चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सासवड विभागाचे निरीक्षक संभाजी बरगे करत आहेत.
अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संतोष जगदाळे, निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक रोहित माने, धवल गोलेकर, शीतल शिंदे, सहायक दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, संदीप मांडवेकर, जवान तात्या शिंदे, अमोल कांबळे, दत्तात्रय पिलावरे, संजय गोरे, बाळासो आढाव, वाहनचालक अंकुश कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अवैध मद्यतस्करीबाबत उत्पादन शुल्क विभागाकडून पथके कार्यरत आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांना याबाबत काही माहिती असेल, तर त्यांनी उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
- अतुल कानडे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे.