माणिक पवार
नसरापूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे रखडल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. 13) पत्रकार परिषद घेऊन निवडणूक जाहीर केल्याने अनेक संभाव्य उमेदवारांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. ग््राामीण भागात जिल्हा परिषद निवडणुका या मिनी विधानसभा म्हणून गणल्या जातात.
जिल्हा परिषदेवर इतर राजकीय समीकरणे बांधली जातात. अखेर प्रलंबित निवडणुका जाहीर झाल्यामुळे मेटाकुटीला आलेल्या उमेदवारांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. रखडलेल्या निवडणुका लागल्याने सर्व अडथळे दूर झाल्याने उमेदवारांची अनिश्चितता संपली आहे. निवडणुकीच्या तयारीला लागून उमेदवार अधिकृत प्रचार करू शकतात आणि लोकांचा पाठिंबा मिळवू शकतात, असा आत्मविश्वास निर्माण झाल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. दि. 5 फेबुवारी रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर होताच इच्छुकांची धाकधूक संपली असून, त्यांनी खऱ्या अर्थाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
अनेक दिवसांपासून सुरू असलेली ‘वेटिंग’ आता संपली असून, उमेदवारांनी आता प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. ज्यामुळे उमेदवारांना निवडणुकीची तयारी करण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक संधी मिळाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकामध्ये भोर तालुक्यात आपलेच पारडे कसे जड राहील, यासाठी संभाव्य इच्छुकांनी आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन गावागावात गाठी-भेटीवर जोर देत प्रचाराचा माहोलच तयार केला होता.
प्रत्येक इच्छुक हे रील्स बनवून सोशल मीडियावर आपलीच हवा असल्याचे दाखवत होते. यामुळे ऐन थंडीत देखील राजकीय वातावरण तापले होते. मात्र, निवडणुका एप्रिलमध्ये जाणार या कल्पनेने भमनिराश झालेल्या अनेक इच्छुकांनी हात आखडता घेतला होता. मात्र, आता अखेर निवडणूक जाहीर झाल्याने या इच्छुकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
आता प्रचाराच्या रणधुमाळीकडे लक्ष
निवडणूक कधी होणार? आचारसंहिता कधी लागणार? या प्रश्नांमुळे थांबलेली कामे आता वेग घेतील. अधिकृतपणे प्रचार करता येणार असल्याने उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात बैठका आणि जनसंपर्कावर भर दिला आहे. तारखा आल्यामुळे तिकिटांची ओढाताण होणार असल्याने राजकीय पक्षांनाही उमेदवारी याद्या लवकरात लवकर जाहीर कराव्या लागणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्याकडे आणि प्रचाराच्या रणधुमाळीकडे वेध लागणार आहे.