पुणे: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शाळांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांच्या उभारणीत लोकसहभागातून काम करण्याचा निर्धार पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने केला आहे. चांगले काम करणार्या उत्कृष्ट शिक्षकांचा आणि शाळांचा गौरव जिल्हा परिषदेकडून केला जाणार आहे. त्यानुसार 27 शिक्षकांची पुरस्कारासाठी आणि 9 शाळांची अध्यक्ष चषक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
शंभर टक्के बालके शाळेत दाखल व्हावीत आणि प्रत्येक मूल शिकले पाहिजे, यासाठी शिक्षक विविध प्रकारे प्रयत्न करीत असतात. जिल्ह्यातील अनेक शाळा 100 टक्के प्रगत व डिजिटल झाल्या आहेत. शिक्षकांच्या या कर्तृत्वाचा जिल्हा परिषदेला अभिमान असून, त्यांच्या सन्मानार्थ उत्कृष्ट शिक्षक, केंद्रप्रमुख तसेच अतिउत्कृष्ट काम करणार्या शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकांना गौरविण्यात येते. (Latest Pune News)
जिल्हास्तरावर निवड झालेल्या शाळांना अध्यक्ष चषक प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, केंद्रप्रमुख पुरस्कार आणि अध्यक्ष चषकासाठी तालुका व जिल्हास्तरावर निवड प्रक्रिया राबविण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
निकष आणि गुणांकनानुसार 13 तालुक्यातील 52 शिक्षक, 2 केंद्रप्रमुख आणि 20 शाळांची तपासणी या पुरस्कारांसाठी करण्यात आली. त्यामधून जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून प्रथम आणि उत्तेजनार्थ अशा 2 शिक्षकांची निवड करण्यात आली.
अशा प्रकारे 13 तालुक्यातील 27 शिक्षक, 1 केंद्रप्रमुख व 9 शाळांची अध्यक्ष चषक पुरस्कारासाठी निवड झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली होती. या समितीमार्फत सन 2025-2026 या वर्षासाठी विविध पुरस्कारांची निवड करण्यात आली आहे.