पुणे : हिवाळ्याच्या तीव्र थंडीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये आणि त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, या सामाजिक जाणिवेतून पुणे शहर व परिसरातील १८ प्राथमिक शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी हुडीज व जॅकेट्सचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ७ ते १० वयोगटातील सुमारे २,००० प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उबदार हुडीज, जॅकेट्स तसेच थंडीचे क्रीम देण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून काही युवकांच्या पुढाकारातून हिवाळ्यात गरजू नागरिकांना ब्लँकेट्सचे वाटप केले जात होते. यंदा मात्र सामाजिक जबाबदारीची दिशा अधिक व्यापक करत, हा उपक्रम थेट शालेय विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यात आला.
थंडीमुळे अनेक मुलांचे आरोग्य बिघडते व शाळेतील उपस्थिती कमी होते, या पार्श्वभूमीवर हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्य, आत्मविश्वास व शिक्षणासाठी आधार ठरला आहे. हा उपक्रम गौरव नहार, अक्षय जैन, अमित लोढा, सिद्धार्थ नहार यांच्यासह युवकांनी राबवला. पुढील प्रत्येक हिवाळ्यात हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले