पुणे

लोकशाहीसाठी तरुण जर्मनीहून थेट पुण्यात; बजावला मतदानाचा हक्क

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मतदान करणे हा अधिकार व कर्तव्य आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतात. मात्र, परदेशात नोकरी किंवा काही कामानिमित्त गेलेले काही जण असेही सुजाण भारतीय आहेत की ते लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत आवर्जून सहभागी होतात. असाच जर्मनी या देशात सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त वास्तव्यास असलेला अन् उरळी कांचन (ता. हवेली) येथील मूळ रहिवासी तरुण सोमवारी (दि. 13) मायदेशात परतला आणि त्याने आपला मतदानाचा हक्क बजावला. चारुदत्त सचिन जाधव (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे या जागरूक मतदार तरुणाचे नाव आहे.

चारुदत्त जाधव हा जर्मनीतील म्युनिक शहरात एका सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त वास्तव्यास होता. इकडे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 13) मतदान होते. यात मतदान करण्यासाठी चारुदत्तने मूळ गावी येण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने प्रवासासाठी हजारो रुपये खर्च करून आपले मूळ गाव उरुळी कांचन गाठले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला.
चारुदत्त हा जर्मनीमधील म्युनिक शहरात महाराष्ट्र राज्य शिवप्रतिष्ठान मंडळ म्युनिकच्या वतीने शिवजयंती, शिवराज्याभिषेक-शाहिरी पोवाडे असे सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो.

त्याची शिवशाहीर म्हणून ओळख आहे. त्याने बालशाहीर पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार जिंकलेले आहेत. चारुदत्तचे वडील सचिन जगन्नाथ जाधव हे एसटी महामंडळात वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. तर आई विद्या जाधव या शिक्षिका आहेत. तसेच त्याचा भाऊ ऋत्वेश जाधव यानेदेखील फ्रान्स देशातून उच्चशिक्षण घेतलेले आहे. परदेशातून येत चारुदत्तने दाखविलेल्या मतदानाबाबतच्या जागरूकतेबद्दल त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT