पुणेः सिंहगड रोड हिंगणे खुर्द येथील खोराड वस्तीत शुक्रवारी (दि.1) रात्री शस्त्रधारी टोळक्याने रस्त्यावर राडा घातल, एका व्यक्तीवर कोयत्याने वार करून त्याच्या खूनाचा प्रयत्न केला. लोखंडी रॉड आणि कोयते घेऊन टोळक्याने गाड्यांची तोडफोड केली आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून, सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी रामकिसन गोरोबा टापरे (वय 49, रा. खोराड वस्ती) यांनी दिली आहे. त्यावरून मोहन गोरे (वय 23) आणि त्याचे पाच ते सहा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी टापरे रस्त्यावर असताना मोहन गोरे आणि त्याचे पाच ते सहा साथीदार हातात कोयते, लोखंडी रॉड घेऊन परिसरात राडा घातला. (Latest Pune News)
‘आम्हीच या भागातील भाई आहोत,’ असा आरडाओरडा करत त्यांनी रॉड व कोयते हवेत फिरवून गाड्यांची तोडफोड केली. या दरम्यान गोरे याने फिर्यादीला उद्देशून ‘तू आम्हाला घाबरत नाहीस का? थांब, तुझा मर्डर करतो,’ अशी धमकी दिली आणि कोयत्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने तो वार हुकवला असता, डोक्याच्या उजव्या बाजूस कानाजवळ घाव बसला. यामध्ये ते जखमी झाले.
या घटनेनंतर आरोपी आणि त्याचे साथीदार फरार झाले. सिंहगड रस्ता पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि दहशत निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. घटनेनंतर वस्तीमध्ये तणावाचे, भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.