पुणे

तरुणांनाही बसतोय स्ट्रोकचा झटका; 4 ते 6 टक्के प्रमाण

अमृता चौगुले

पिंपरी : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांना स्ट्रोकचा (पक्षाघात) झटका बसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हे प्रमाण 4 ते 10 टक्के इतके आहे. फास्टफूडचे वाढते प्रमाण, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, अनुवंशिकता, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी कारणांमुळे स्ट्रोक येत आहेत. त्यामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण 10 टक्क्यांपर्यंत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले आहे.

स्ट्रोक म्हणजे काय ?

स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक अथवा लकवा होय. याला ब्रेन अटॅक असेही म्हटले जाते. स्ट्रोक हा सर्वसाधारपणे उतारवयात होणारा आजार आहे. मात्र, अलीकडे तरुण वयातही स्ट्रोक येण्याचे प्रमाण वाढले आहे.

प्रमुख कारणे काय?

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, मद्यसेवन आदी कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे, अनुवंशिकता, व्यायामाचा अभाव, पुरेशी झोप न होणे, बैठी जीवनशैली, फास्टफूडचे वाढते प्रमाण आदी कारणेही त्यामध्ये आढळतात.

साडेचार तासांच्या आत हवे औषधोपचार

स्ट्रोक आलेल्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलविणे गरजेचे असते. साडेचार तासांच्या आत रुग्णाला सिटी स्कॅनची सुविधा असणार्‍या रुग्णालयात हलविणे गरजेचे आहे. म्हणजे त्या रुग्णावर तत्काळ औषधोपचार होऊन मेंदूचे होणारे नुकसान व अपंगत्वाचे प्रमाण कमी करता येऊ शकते.

स्ट्रोकमुळे होणारे परिणाम

हातापायांना लकवा होतो. काही लोकांना बोलायला त्रास होतो. हात-पाय गळुन जातात. शरीराच्या एका बाजूचे अवयव निकामी होतात. शरीराच्या डाव्या बाजूला हा त्रास झाल्यास बोलण्याची प्रक्रिया कमी होते.

प्रतिबंधात्मक उपाय

  • दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा.
  • सात ते आठ तास झोप घ्यायला हवी.
  • जेवण आणि नाश्ता वेळेत घ्यावा.
  • जंकफूड खाणे टाळायला हवे.
  • लठ्ठपणा वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • मधुमेही रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी.
  • उच्च रक्तदाब असणार्‍या रुग्णांनी नियमित गोळ्या घेऊन रक्तदाब नियंत्रणात ठेवावा.

तरुणांनाही सध्या उच्च रक्तदाब, मधुमेह हे आजार होत असल्याने त्यांच्यामध्ये स्ट्रोकचा धोका वाढला आहे. स्ट्रोकमुळे रुग्णांना अपंगत्व येते. साधारण 10 टक्के इतका मृत्यूदर आहे. तर, 4 ते 6 टक्के तरुणांमध्ये स्ट्रोकचा झटका येण्याचे प्रमाण आढळते.

– डॉ. सतीश निर्हाळे, न्युरोलॉजिस्ट.

स्ट्रोकसाठी प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वाढते वय ही प्रमुख कारणे आहेत. त्याचप्रमाणे, वाढती व्यसनाधीनता, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा या कारणांमुळे सध्या तरुणांनादेखील स्ट्रोक येत आहेत. स्ट्रोक आल्यानंतर साडेचार तासांच्या आत रुग्ण सिटी स्कॅनची सुविधा असलेल्या रुग्णालयात पोहोचणे गरजेचे आहे.

– डॉ. अमित पांडे, न्युरोलॉजिस्ट.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT