पुणे: आजचा तरुण पाश्चात्त्य संस्कृतीच्या आणि सोशल मीडियाच्या जगात हरवून गेला आहे, असा आक्षेप नेहमी घेतला जातो. मात्र, याच आधुनिक पिढीतील उच्चशिक्षित तरुण जेव्हा खांद्यावर भगवी पताका घेऊन विठुरायाच्या नामात लीन होतात, तेव्हा वारीचे सौंदर्य आणखी खुलते. याचाच प्रत्यय जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आला.
वैभव मुंगसे, केशव मेहुनकार आणि निखिल सावजी हे वयवर्षे २३ ते २५ गटातील तरुण वारीच्या रिंगणात टाळ-मृदंगांच्या तालावर तल्लीन होऊन नाचताना दिसले. हे फक्त हौस म्हणून वारीत आलेले नव्हते, तर ते उच्चशिक्षित असून ''एमबीए'' MBA सारख्या व्यावसायिक पदवीचे शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, हे कोणी एका वर्षाचे नव्हे, तर अगदी लहानपणापासून नित्यनियमाने वारीची वाट चालत आहेत.
दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने या तरुण वारकऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी आपला वारीचा अनुभव आणि त्यामागची भावना अत्यंत उत्साहाने मांडली. आम्ही अगदी लहान असल्यापासून आई-वडिलांसोबत वारीत येत आहोत. तेव्हा वारी काय असते, हे कळत नव्हते; पण विठ्ठलनामाची गोडी लागली.