Ashadhi Wari: यंदा शेत पांडुरंगाच्या हवाली करून वारीला आलो; वारीला आलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली भावना

पाऊस नसल्याने शेतात काहीच पेरता आलं नाही
Ashadhi Wari
Ashadhi WariPudhari
Published on
Updated on

आशिष देशमुख

पुणे: 'अवघा जून कोरडा गेला, जुलैतही पाऊस खूप कमी झाला. शेतात काहीही न पेरताच वारीला आलो. यंदा शेत पांडुरंगाच्या हवाली केलंय. वारीनंतर पाऊस आला, तरच पेरणी करू. सरकारने तोवर आम्हाला कर्जमाफीची रक्कम दिली तर बरं होईल..!' हे उद्गा‌र आहेत यंदा पंढरपूरकडे निघालेल्या वारीतील शेतकरी बांधवांचे. प्रामुख्याने मराठवाडा आणि सोलापूर या भागांतून आलेल्या शेतकऱ्यांनी ही व्यथा व्यक्त केली.

Ashadhi Wari
Khadakwasla Dam Water Storage: धरणसाखळीत ५५.४९ टक्के पाणीसाठा; गेल्या २४ तासांत सव्वा टीएमसीची भर

पुणे शहरात गुरुवारी सायंकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गु‌रू तुकाराम महाराज यांच्यासह पालख्यांचे थाटात आगमन झाले. मराठवाडा आणि सोलापूर या जिल्ह्यांत अत्यल्प पाऊस झाल्याने शेतात काहीही न पेरता शेतकरी वारीला आल्याचे दिसून आले. दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने राज्याच्या विविध भागांतून आलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधला.

Ashadhi Wari
Undri Illegal RMC Plants: ‘रेडीमिक्स प्लांट्स’मुळे जीवन जगणे झाले अवघड; उंड्रीतील संतप्त नागरिकांची भावना

मराठवाडा आणि सोलापूर या भागांत पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल असल्याचे दिसले. जून कोरडा गेला. मात्र, जुलै महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस झाला. मात्र, आमच्या भागात पाऊसच झाला नाही. आता वारीहून परत गेल्यावरच पाऊस झाला तर पेरणी करू, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

पांडुरंगाच्या गावी यंदा पाऊस नाही. जिल्ह्यातही नाही. त्यामुळे काहीच पेरता आलं नाही. सरकारने कर्जमाफीचे पैसे लवकर द्यावेत, ही प्रार्थना करतो. ते पैसे हातात आले तरच आमचं भागेल; अन्यथा यंदा परिस्थिती कठीण आहे.

- तानाजी नवले, पंढरपूर

मी गत साठ वर्षांपासून वारीला येते. यंदा संपूर्ण राज्यात पाऊस झाला; पण मराठवाड्यात खूप कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतात काही पेरता आलं नाही. न पेरताच वारीला निघाले. आता भिस्त पांडुरंगावरच आहे. वारी आटोपून गेल्यावर जर पाऊस झाला, तरच पेरणी करता येईल.

- मथुराबाई जंजाळ, हदगाव, जिल्हा नांदेड

आमच्या गावात थोडासाच पाऊस झाला. पण, पाटाचं थोडं पाणी मिळाल्यानं ऊस कसाबसा जगवतो आहोत. दरवर्षी इकडे येताना आमच्या भागात पेरणी झालेली असते. वारी झाली की परत आल्यावर पिकं थोडी मोठी झालेली पाहायला मिळतात. पण, यंदा पाऊसच नाही. त्यामुळे खूप कठीण परिस्थिती आहे.

- रामनाथ नखाते, पाथरी, जिल्हा परभणी

मी पंढरपूरमधून दरवर्षी आळंदीला येतो. तेथून माउलींच्या पाळखीसोबत आपल्या गावी येतो. यंदा साक्षात पांडुरंगाच्या जिल्ह्यात अन्‌ गावातही पाऊस नाही. पाऊसच झाला नाही, तर शेतात काय पेरणार? आता वारी झाल्यावर पाऊस आला तर शेतात पेरणी करता येईल. आता त्यालाच साकडं घातलंय 'बा पांडुरंगा, राज्यात सर्वत्र पाऊस पडू दे. चांगलं पीक येऊ दे.'

- औदुंबर शेळके, पंढरपूर

मराठवाड्यात खूप कमी पाऊस झाला. फक्त जूनमध्ये जालना जिल्ह्यात थोडा पाऊस झाल्याने कापूस, सोयबीन शेतात लावले. पण, पुढे पावसाने ओढ दिली. त्यामुळे पिके आता पाण्यासाठी तळमळत आहेत. पांडुरंगाच्या भरवशावर शेवटी वारीला आलो आहे. आता तोच काहीतरी करेल, असा विश्वास आहे.

- राम गडदे, बदनापूर, जिल्हा जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news