पुणे: सोशल मीडियावरून झालेली ओळख महिलेला चांगलीच महागात पडली आहे. महिलेला भेटण्यासाठी बोलावून नशेची गोळी देत तरुणाने तिचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर हे फोटो प्रसारित करण्याची तसेच पती व मुलाला मारून टाकण्याची धमकी देत तिच्याकडे पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनुराग शर्मा (वय 23) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फेब्रुवारी 2023 ते 5 जून 2025 दरम्यान घडली. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला आरोपी अनुरागने सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रीची ‘रिक्वेस्ट’ पाठवली. त्यानंतर त्याने पीडित महिलेचा विश्वास संपादन करून तिचा आयडी व पासवर्ड घेतला. त्यावरून पीडितेची छायाचित्रे सेव्ह करून घेत तिला लग्न करण्यासाठी मागणी घातली. मात्र, पीडितेने लग्नाला नकार दिला. त्यावर, त्याने पैसे पाठव अन्यथा तिची छायाचित्रे सर्वत्र प्रसारित करण्याची धमकी दिली. नंतर
त्याने पीडितेचे व तिच्या पतीचे फेक खाते उघडले. या खात्यावरून तिच्या नातेवाईकांना मैत्रीसाठी ‘रिक्वेस्ट’ पाठवली. पीडितेने याबाबत विचारणा केली असता आरोपीने तिला भेटण्याचा तगादा लावला.
महिला भेटण्यास आल्यानंतर नशेची गोळी देऊन आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. नंतर त्याने हे फोटो प्रसारित करण्याची; तसेच तिच्या पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत पीडितेकडे खंडणी स्वरूपात पैशांची मागणी केली, असे तक्रारीत नमूद आहे. विमानतळ पोलिस पुढील तपास करत आहेत.
पाठलाग करून महिलेचा विनयभंग
हडपसर परिसरात एका विवाहित महिलेचा तरुणाने सातत्याने पाठलाग करत तिला भररस्त्यात अडवून विनयभंग केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पाडुरंग महादेव रामपुरे (वय 32, रा. मांजरी) याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात 27 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
आरोपी पीडितेला वेगवेगळ्या मोबाईलवरून फोन व मेसेज करायचा. त्यामुळे महिलेने आरोपीचा मोबाईल क्रमांक ‘ब्लॉक’ केला असता, आरोपीने पीडितेचा पाठलाग सुरू केला. तिला रस्त्यात अडवून ‘माझा मोबाइल क्रमांक ब्लॉक का केला, मला बोलायला आवडत’, असे म्हणत तिचा विनयभंग केला, असे तक्रारीत नमूद आहे.