पुणे

नवी सांगवी : तुम्हीच सांगा, पदपथ नेमका कोणासाठी?

अमृता चौगुले

नवी सांगवी(पुणे) : पिंपळे गुरव येथील रामकृष्ण चौकाकडून काटेपुरम चौकाच्या दिशेने येणार्‍या रस्त्यावर नव्याने रस्तारुंदीकरण करण्यात आले आहे. पदपथही मोठे केले आहेत. मात्र पदपथांचा उपयोग सर्रास गाड्या पार्किंगसाठी केला जात आहे. त्यामुळे पदपथांवर वाहन लावणार्‍या चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पादचार्‍यांना पार्किंगचा अडथळा

काटेपुरम चौक ते रामकृष्ण मंगल कार्यालय चौक रस्त्यावर दुतर्फा खाद्यपदार्थ विक्रेते, दुचाकी गॅरेज, चारचाकी गॅरेज, भंगार दुकाने, चहाचे टपरी, भर चौकात पादचारी मार्गावरच रिक्षा, चारचाकी वाहने पार्क करून पादचारी मार्गच काबीज केले आहे. त्यामुळे पदपथ नेमका कुणासाठी? पायी चालणार्‍या नागरिकांसाठी की, वाहन पार्क करण्यासाठी, असा प्रश्न नागरिकांमधून होत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत लाखो रुपये खर्च करून येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, पदपथ, ड्रेनेजलाईन, स्टॉर्म वॉटरलाईन, स्ट्रीट लाईट, सुलभ स्मार्ट शौचालय आदी सुविधा स्मार्ट करण्यात आल्या आहेत. या सुविधांचा नियमानुसार वापर करणे अत्यावश्यक आहे. परिसर जसा स्मार्ट झाला आहे. तसे नागरिकांनीदेखील स्मार्ट होणे आता आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी वाहतुकीचे महापालिका प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे; अन्यथा परिसराचा बकालपणा निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. अनेकदा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पदपथावरील कारवाई होत असते.

मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी

कारवाईनंतर पुन्हा काही तासांतच पुन्हा जैसे थे परिस्थिती दिसत आहे. सकाळी व सायंकाळी येथील बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू, भाजी खरेदीसाठी, फेरफटका मारण्यासाठी नागरिक, शालेय विद्यार्थी ये-जा करीत असतात. या वेळी पादचारी मार्गावरच चारचाकी, दुचाकी, रिक्षा आदी वाहने, गॅरेजमधील वाहने पार्क केलेली पाहावयास मिळत आहेत. खाद्यपदार्थ विक्रेते व ग्राहक पदपथावर अडथळा निर्माण करीत असतात. त्यामुळे नागरिकांना पदपथ सोडून रस्त्यावर उतरून अक्षरशः जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. तसेच, यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे.

नागरिकांनी केली कारवाईची मागणी

येथील चौकात बाजारपेठ असल्याने सतत वाहतुकीची वर्दळ असते. पिंपळे गुरव परिसरात भाजी विक्रेते, फळविक्रेते, व्यावसायिक यांनी पदपथ अक्षरशः गिळंकृत केला आहे. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे कठीण झाले आहे. पदपथ नेमका कुणासाठी? हेच समजत नाही. संबंधित वाहतूक पोलिस विभाग आणि महापालिकेचे अतिक्रमण विभाग यांनी वेळोवेळी अशांवर त्वरित कारवाई करून पदपथ सुरळीत करून द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT