World Heart Day Yoga Heart Health information in marathi
पुणे: कठीण व्यायाम आणि शारीरिक हालचालींचा अभाव हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. दीर्घकाळ निष्क्रिय जीवनशैलीमुळे रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल आणि वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. परिणामी हृदयविकारासह पक्षाघाताचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित शारीरिक हालचाल, योग आणि व्यायाम महत्त्वाचा आहे. मात्र, योग करताना 'जितका अधिक तितका फायदा' असा गैरसमजही टाळणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील योग प्रशिक्षक आणि योग समुपदेशन मनोज पटवर्धन यांनी ही माहिती दिली. प्राणायाम किंवा आसनांचा सराव करताना शरीराच्या क्षमतेचा विचार करणे आवश्यक आहे. प्राणायाम करताना क्षमतेपेक्षा अधिक वेळ श्वास रोखून धरणे टाळावे. कुंभकामुळे रक्तदाबात बदल होऊ शकतो. त्याचप्रमाणे कपालभाती किंवा भस्त्रिका अतिजोराने केल्यास श्वसनसंस्थेवर तसेच हृदय व रक्ताभिसरणावर ताण येतो, असे पटवर्धन म्हणाले.
योगाचा योग्य सराव मात्र शरीर आणि मनासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे योग टाळण्याऐवजी तो योग्य पद्धतीने, नियमित आणि शरीराच्या क्षमतेनुसार करणे आवश्यक आहे. डब्ल्यूएचओनुसार प्रौढांनी आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेची शारीरिक हालचाल करणे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे पवर्धन यांनी नमूद केले.
काय आणि कसे ?
व्यायामाचा अभाव असल्यास वजन, रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. नियमित शारीरिक हालचालींमुळे हे धोके कमी करण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभर बसून राहण्याऐवजी चालणे, व्यायाम किंवा योग्य पद्धतीने योगाभ्यास करणे आवश्यक आहे, असे पटवर्धन सांगतात.
क्षमतेपेक्षा अधिक वेळ श्वास रोखून ठेवू नये
कपालभाती, भस्त्रिका अतिजोराने करू नये
योग्य मार्गदर्शनाशिवाय अवघड किंवा उलटी आसने करू नका.
चक्कर, छातीत दुखणे किंवा धाप लागल्यास सराव तातडीने थांबवावा
हृदयरोग अथवा उच्च रक्तदाब असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.