पुणे: येरवडा परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बिंदू माधव ठाकरे चौकात उड्डाणपुलाबरोबरच ग्रेडसेपरेटर उभारण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया महापालिक प्रशासनाकडून काढण्यात आली होती. शनिवारी महापालिकेच्या स्थायी समितीत या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.
त्यामुळे येथील वाहतूक आता आणखी वेगवान होणार आहे. पुढील अडीच वर्षांत हा पूल उभारण्याचे नियोजन असून, येत्या महिनाभरात वाहतूक पोलिसांसह नियोजन करून या पुलाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती प्रकल्प विभागाचे प्रमुख, दिनकर गोंजारे यांनी दिली. (Latest Pune News)
शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये रस्तेरुंदीकरणासह महत्त्वाच्या चौकांवर फ्लायओव्हर आणि ग्रेडसेपरेटर उभारण्याचा समावेश आहे. त्याअंतर्गत येरवडा परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बिंदू माधव ठाकरे चोकात फ्लायओव्हरबरोबर ग्रेडसेपरेटर उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रकल्प विभागाने घेतला आहे.
याबाबतच्या प्रस्ताव प्रकल्प विभागाने प्रकल्प आराखडा तयार करून स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी मांडला होता. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली.
बिंदू माधव ठाकरे चोकातून संगमवाडी, खडकी, बंडगार्डन पूल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीकडे जाता येते. तसेच शिवाजीनगर, स्वारगेट, कोथरूडसह शहराच्या पश्चिम व दक्षिण भागातून विमानतळासह आळंदी व नगरकडे ये-जा करण्यासाठी वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात पाटील इस्टेट येथून संगमवाडी रस्त्यावरून येरवड्यातील बिंदू माधव ठाकरे चौकाचा वापर केला जातो. त्यामुळे या भागात सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते.
बिंदू माधव ठाकरे चौकात उड्डाणपुलासह ग्रेडसेपरेटर उभारण्यास स्थायी समितीची मंजुरी
असा असेल उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटर
खडकीहून बंडगार्डनकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन मार्गिका बांधण्यात येणार आहेत. यामुळे वाहतूक वेगवान होणार आहे.
तर संगमवाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे व बंडगार्डनकडे जाण्यासाठी ‘वाय” आकाराचा ग्रेडसेपरेटर बांधण्यात येणार आहे. हा ग्रेडसेपरेटर एकेरी राहणार आहे.
उड्डाणपुलाची लांबी 900 मीटर, तर रुंदी 15.60 मीटर राहणार आहे.
उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना 2-2 मार्गिका असणार आहेत.
संगमवाडीहून डॉ. आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या ग्रेडसेपरेटरडसेपरेटरची लांबी 550 मीटर असणार आहे.
बंडगार्डनकडे जाणाऱ्या ग्रेडसेपरेटरची लांबी 440 मीटर राहणार आहे.
संगमवाडी बाजूचा ग्रेडसेपरेटर 9 मीटर रुंद व तीन मार्गिकांचा तयार करण्यात येणार आहे.
डॉ. आंबेडकर चौक व बंडगार्डनकडे जाणारा ग्रेडसेपरेटर भाग 7.5 मीटर रुंद व प्रत्येकी दोन मार्गिकांचा तयार करण्यात येणार आहे.
वळणाच्या ठिकाणी ग्रेडसेपरेटरची रुंदी 1.5 मीटरपेक्षा जास्त राहणार आहे.
प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे.
‘येरवड्यातील बिंदू माधव ठाकरे चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. वाहतूक विभागाशी समन्वय ठेवून पुढील महिनाभरात या पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे.- दिनकर गोजारे, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग, महापालिका